*कोंकण Express*
*थोर व्यक्तिमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो : अजयराज वराडकर*
थोर व्यक्तीमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो आणि अशी थोर व्यक्तीमत्वे आपल्या भारत भूमीत जन्मली व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आपली प्रगती झाली अशी व्यक्तिमत्त्व समाजाला पर्यायाने आपल्याला प्रभावित करत असतात त्यातून आपण सर्वांनीच बोध घेतला पाहिजे व त्यांचे स्मरण वेळोवेळी करणे आवश्यक असून अशा थोर लोकांच्या विचारावर आपण जगलं पाहिजे असे उद्गार, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती तसेच कर्मयोगी, योगात्मा स्वर्गीय डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या ४८व्या पुण्यतिथी निमित्त शालेय संसदे मार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला घालून दिलेले अहिंसेचे समर्थन करताना व मिळवलेल्या स्वातंत्र्याविषयी असणारी जाणीव याविषयी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून आपण अशा त्यागाच्या मूर्तीला वंदन करून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत व गांधीजींचा स्वच्छता संदेश नेहमी अंगीकारला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ‘जय जवान, जय किसान..!’ या घोषणेबद्दल बोलताना लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशात राबविलेल्या अनेक योजना त्यांच्यामध्ये असणारे मानवी मूल्य याविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने क.प. शि. प्र. मंडळ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कर्मयोगी, योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या विचाराचा आणि कार्याचा आलेख मांडताना, त्यांनी सुरू केलेली सन १९२६ शाळा. त्यांचे वैद्यकीय सेवेतून मिळालेल्या अर्थाजनातून केलेले शाळेचे कार्य ते आजपर्यंत शाळेने केलेली प्रगती याबद्दल माहिती देताना, 1926 पासून शिक्षणप्रेमी कर्मयोगी स्व. योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर व त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य करणारे त्यांचे विश्वासू सहकारी यांच्याविषयी आदर व्यक्त केला. त्याचबरोबर कट्टा दशक्रोशीमध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्यामधील डॉ. काकासाहेबांचे योगदान आजच्या युगात किती महत्त्वाचे ठरले आहे यावरती भाष्य करताना क प.शि.प्र.मंडळाच्या वतीने विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर यांच्या संकल्पनेतून साकारणारा “गावी रहा, मोठे व्हा…” हा उपक्रमाची व्याप्ती भविष्यात आपल्या शाळेच्या माध्यमातून वाढवूया असा मानस व्यक्त केला. शहरीकरणाच्यां प्रलोभनाला बळी पडून आजचा युवा वर्ग हा ग्रामीण भागातून सुटत चालला आहे व त्यामुळे ग्रामीण भागाचे सामाजिक संतुलन बिघडत असून छोटी छोटी गावे सुद्धा ओस पडताना दिसत आहेत. कोकणातील समृद्ध निसर्ग आणि गांवे बकाल न होता ती संपन्न बनू शकतात हा या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आपल्या संस्थेने म्हणजे क.पं.शि.प्र. मंडळाने शाळेत गेल्या शैक्षणिक वर्षांपासून कौशल्याभिमुख शिक्षणाची सुरुवात केली असून यातून मूल्यात्मक गुणी विद्यार्थी निर्माण करण्याची जबाबदारी आम्हां सर्वांची असून यात पालकांची जबाबदारी सुद्धा वाढली आहे. मोबाईल फोनचा अतिवापर टाळण्यासाठी सर्व पालकांनी दक्ष राहून शाळांना सहकार्य करावे. यासाठी पालकांचे योगदान शिक्षकांइतकेच महत्वाचे असून स्ट्रीट आणि फास्ट फूडचा वापर न करता त्यांना दैनंदिन घरगुती आहाराचा लाभ घेण्यासाठी पालकांनी प्रबोधन करावं. शाळेमध्ये होणारे कला, क्रीडा, भाषा, गणित, विज्ञान आणि शिष्यवृत्ती परीक्षा अश्या विविध उपक्रमातून निरोगी आणि सशक्त विद्यार्थी घडवण्यासाठी सकस आहार ही महत्त्वाचा आहे याची आठवणही करून दिली..
‘योगात्मा स्व. डॉ. काकासाहेब वराडकर टॅलेंट सर्च’ या सारख्या परीक्षेच्या माध्यमातून शालेय मुलांच्यात उत्तम संस्कार देत त्यांच्यातील वाचकला जागे केलं पाहिजे. वाचन वाढले की विचार प्रगल्भ होतात. या सारख्या उपक्रमातून आपल्या देशाची भावी संस्कारक्षम पिढी घडावी आणि त्यातून छोटे मोठे उद्योजक आणि ग्रामीण भागातून मोठे अधिकारी घडवेत असा क.पं.शि.प्र मंडळाचा प्रयत्न आहे यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन, व्यायाम, घरचा पोषक आहार आणि शिस्त ही मुल्ये आत्मसात करावीत आणीन अंगी बाळगावीत असे उद्बोधनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी धनंजय गावडे यांनी केले .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा यात स्वामी शिवानंद इंग्रजी निबंध आणि योगात्मा स्व.डॉ. काकासाहेब वराडकर टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच प्रशालेतील विज्ञान गणित शिक्षक पी. व्हीं. कानूरकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने योगात्मा स्व. डॉ. काकासाहेब वराडकर यांना श्रद्धांजली म्हणून प्रशालेचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी स्वरचित कविता सादर केली. या वेळी डॉ.दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.संचीता करावडे, कु.प्राची परब, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची कु.भाग्यश्री सावंत, कु. कृतिका लोहार, कु. मयूर पेंडुरकर, कु. दर्श वराडकर यांनी भाषणे सादर केली. कु.स्वरा पेंडुरकर हिने सुमधुर आवाजात म. गांधी यांचे भजन गायिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा परिसरातील स्वच्छ्ता करण्यात आली. तसेच हरित सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती पालव यांनी तर आभार प्रदर्शन सौ.फोपळे यांनी केले. याप्रसंगी कपं.शि. प्र.मंडळाचे सचिव सुनीलजी नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, संचालक श्री महेश वाईरकर, संचालिका स्वाती वराडकर, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, वराडकर इंग्लिश मिडीयमच्या जेष्ठ शिक्षिका सौ. शिरोडकर, संसद उपाधिपती के.एम. हडलगेकर, सहायक उपाधिपती भूषण गावडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.