*कोकण Express*
*श्रावणी सोमवार निमित्त बुरंबावडे येथील श्री गांगेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण संपन्न*
*निसर्ग मित्र परिवार तळेरे व बुरंबावडे ग्रामविकास मंडळाचा स्तुत्य उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे श्रावणी सोमवार निमित्त दर सोमवारी ग्रामदेवता श्री गांगेश्वर देवाचा अभिषेक, महाप्रसाद,भजन व महाआरती अशा उपक्रमांनी उत्सव करण्यात येतो. याचे औचित्य साधून मंदिराच्या देवराई मध्ये विविध प्रकारच्या सतरा वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम आज तिसऱ्या श्रावण सोमवारी राबविण्यात आला होता.
श्रावणी सोमवार निमित्त बुरंबावडे येथे श्री देव गांगेश्वराच्या मंदिराच्या देवराईच्या आवारात तळेरे येथील निसर्ग मित्र परिवार व बुरंबावडे येथील बुरंबावडे ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उपयुक्त व संजीवक अशा १७ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्ष तळेरे येथील निसर्ग मित्रपरिवार या संघटनेच्या वतीने बुरंबावडे ग्रामविकास मंडळास सौजन्यपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण प्रसंगी निसर्ग मित्रपरिवारचे अध्यक्ष व पत्रकार संजय खानविलकर, बुरंबावडे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संदेश मांजरेकर, मंडळाचे सचिव आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा नशाबंदी समितीच्या जिल्हाध्यक्षा सौ.श्रावणी मदभावे, तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, तळेरे येथील श्रावणी कम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, बुरंबावडे प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बांदिवडेकर, तळेरे माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक सचिन शेट्ये, नवलसिंग तडवी, बुरंबावडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पास्टे, संगीत अलंकार अजित गोसावी, सौ.स्मिता कोळेकर इत्यादी मान्यवर तसेच बुरंबावडे येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांतर्गत बुरंबावडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने निसर्ग मित्र परिवार तळेरे या संघटनेचा संघटनेचे अध्यक्ष पत्रकार संजय खानविलकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला. तसेच बुरंबावडे प्राथमिक शाळेत गेली ११ वर्षे उत्तमतः कार्यरत राहून बदली होऊन अन्य शाळेत गेलेल्या सहशिक्षक संदीप कोळेकर यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नशाबंदी समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या बुरंबावडे गावच्या सुकन्या सौ.श्रावणी सतीश मदभावे (पूर्वाश्रमीच्या ज्योत्स्ना उदय दुदवडकर) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
करण्यात आला.
तसेच प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी मंदीराच्या देवराई परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुरंबावडे ग्राम विकास मंडळाचे (ग्रामीण) विद्यमान सचिव उदय दुदवडकर यांनी केले. माजी सचिव सुरेश मांजरेकर यांनी आभार व्यक्त केले.