जवानांचे बलिदान सार्थकी लागले पाहिजे

जवानांचे बलिदान सार्थकी लागले पाहिजे

*कोंकण Express*

*जवानांचे बलिदान सार्थकी लागले पाहिजे*

*डॉ. संतोष रायबोले*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये कारगिल दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकामध्ये बोलताना लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव म्हणाले की, अनेक वर्षे आपण पारतंत्र्यात राहिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. भारताची फाळणी हा काळा दिवस मानला जातो. फाळणीच्या काळात हिंदू आणि मुस्लिम, यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात दंगली घडून आल्या. दंगलीच्या काळात देशात शांतता प्रस्थापित करण्याचे यशस्वी काम महात्मा गांधी यांनी केले. स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक युद्धे झाली. अनेक युद्धात भारताचे सैन्य पाकिस्तानच्या लाहोर, मुलतान या भागापर्यंत पोहोचले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे प्रमुख कारण म्हणजे काश्मीर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा प्रश्न अधांतरीत ठेवण्यात आला आहे. असे मत व्यक्त केले. कारगिलच्या युद्धात भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली आणि विजय संपादन करून देशाचे रक्षण केले.

आपल्या मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, आज सैन्याच्या त्यागामुळे कारगिल हा भारताचा अविभाज्य घटक आहे. भारत अखंड, समृद्ध राहण्यासाठी ज्या सैनिकांनी जीवाची बाजी लावली त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये सैनिक सीमेवर राहतात त्यांची ही कल्पना करवत नाही. त्यामुळे कारगिल हा एक केवळ प्रदेश नाही तर ती एक अस्मिता आहे. एखाद्या सैनिकाचे मनोगत ऐकले तर अंगावर काटा येतो. सैनिक ज्या परिस्थितीमध्ये सीमेवर राहतात ती परिस्थिती खडतर असते. त्यांचे जीवन म्हणजे त्यागाचे मोठे उदाहरण आहे. त्यामुळे कारगिल विजय दिवस हा एक दिवस नसून तो एक त्यागाचा,राष्ट्र प्रेमाचा दिवस आहे.

कार्यक्रमाचे आभार डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्याल्याचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!