*कोंकण Express*
*अतिवृष्टीने बाधित कुटुंबांना सर्व सुविधा द्या…*
*खा.नारायण राणे यांच्या सूचना:ओरोस ख्रिश्चनवाडी येथील पूरग्रस्तांची घेतली भेट..*
*ओरोस ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई मी व पालकमंत्री रवींद्र चव्हाण शासनाकडून मिळवून देवू. कोकणातील घरे वेगळी असतात. त्यानुसार त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे खा नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासन आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले. तसेच बाधित कुटुंबीयांना अन्न, औषधे, निवारा कमी पडू देवू नका. शासनाकडून तत्काळ मदत करा, अशा सूचना आपण प्रशासनाला केल्याचे सुद्धा यावेळी खा राणे यांनी सांगितले.
रविवारी झालेल्या अतिवृष्टीने ओरोस ख्रिश्चनवाडी येथील सात घरांना मोठा धोका पोहोचला असून अनेक घरांत पाणी घुसले होते. याची पाहणी आज खा राणे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत निलेश राणे, रणजित देसाई, सुप्रिया वालावलकर, दादा साईल यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी खा राणे यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात नुकसानीचा आढावा घेतला.