*कोंकण Express*
*गुणवंत मुलेच मोठी संपत्ती : संतोष किंजवडेकर*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी अमृतमहोत्सव कार्यक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
सर्व ग्रामस्थांनी केलेल्या परिश्रमाचे फलित म्हणजे आजचा सुंदर नियोजनपूर्वक सुरू असलेला अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. यानंतर 100 वे वर्षही मोठ्या प्रमाणात साजरे करूया. मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही नेहमीच मदत करायला तयार आहोत. कारण, गावच्या मुलांनी राज्यस्तरावर झेप घेतली तर गावाचे नाव होईल आणि तीच मोठी संपत्ती असल्याचे प्रतिपादन किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी केले.ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंकवडे ठाकूरवाडी शाळेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संतोष किंजवडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे यांच्या हस्ते सरस्वती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी सदस्य सौ. मनस्वी घारे, विकास सोसायटी चेअरमन किरण टेंबुलकर, ग्रामसेवक शिवराज राठोड, किंजवडे हायस्कूलचे चेअरमन रामचंद्र परब, किंजवडे हायस्कूल मुख्याध्यापक आनंद कदम, अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष गणेश चव्हाण, उपाध्यक्ष अनिकेत ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप परब, मुख्याध्यापक गोविंद जाधव, माजी शिक्षक भगवान मेटकर, गुंडू लिवंगे, बारस्कर, विवेक कुलकर्णी, विजय पारकर, मुकेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सौ. मनस्वी घारे म्हणाल्या की, मुलांना कौतुकाची थाप मिळणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा सुंदर कार्यक्रम महत्त्वाचा ठरत आहे. शिवाय, या शाळेचे रूप बदलण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचेही मोल महत्त्वाचे आहे. यावेळी किरण टेंबुलकर, एस. डी. राठोड, भगवान मेटकर, रामचंद्र परब यांनी मनोगत व्यक्त केले.विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी तसेच 1983 ते 2023 पर्यंत याच शाळेतून पुढे १० वी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेले विद्यार्थी, या शाळेचे सर्व आजी माजी शिक्षक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर गोपाळ जाधव, शिवराज राठोड, मंगेश पारकर यांना विशेष सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरव करण्यात आला.यावेळी आयोजित आजी माजी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात रागिणी कुलकर्णी यांच्या बासरी वादनाने करण्यात आली. त्यानंतर अनेक मुलांनी आपल्या विविध कला सादर केल्या. त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पारकर यांनी केले.यावेळी ठाकूरवाडी आणि परबवाडी मधील इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असलेल्या मुलांना सुहास परब यांच्या सौजन्याने मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच, या शाळेत शिकत असलेल्या सर्व मुलांना अमृतमहोत्सवी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपक परब यांनी मानले.