*कोंकण Express*
*जि. प. आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे दप्तराविना शाळा व पारंपारिक खेळ महोत्सव संपन्न!*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
‘पी एम श्री’ या केंद्र सgरकारच्या महत्वपूर्ण अशा शैक्षणिक योजनेमध्ये निवड झालेल्या जि. प. आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे ‘दप्तराविना शाळा’ व ‘पारंपरिक खेळ महोत्सव’ असे दोन शैक्षणिक उपक्रम शनिवार दि. २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करावे, तसेच काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या विविध पारंपारिक खेळांची माहिती व अनुभवानंद शालेय विद्यार्थ्यांना मिळावा अशा बहूउद्देशाने सदरील दोन्ही शैक्षणिक उपक्रमांचे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या शैक्षणिक अभियांनातर्गत संयुक्तरित्या आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी विद्यार्थी दप्तराविना शाळेमध्ये उपस्थित होते. तसेच त्यांनी विविध पारंपारिक खेळांची माहिती स्वयंप्रेरणेने मिळवून त्याद्वारे स्वतः बनविलेले रंगीबेरंगी कागदी पतंग, गोट्या, नारळी करवंटी व कापडी चेंडू यांचा वापर केलेले लगोरीचे साहित्य, पची खेळासाठी निवडक गुळगुळीत दगडगोटे, लाकडी भोवरा, लाकडी विटी व दांडू इ. क्रीडा साहित्य सोबत आणलेले होते. सदरील क्रीडा साहित्याच्या माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या विविध पारंपारिक खेळांची ओळख, खेळ पद्धत व खेळांचे महत्व यांबद्दलची सर्वंकष अशी माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगितली. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी पतंग उडविणे, गोट्या खेळणे, लगोरी खेळणे, पची खेळणे, विटी – दांडू खेळणे यासह लंगडी, लपाछपी, पकडापकडी अशा विविध पारंपारिक खेळांचा मनमुराद आनंद घेतला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव, सदस्य वैभव मुद्राळे, अनिरुद्र लवेकर, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, शिक्षक श्रीराम विभूते, शिक्षिका प्रणाली चव्हाण, विद्या कदम, साधना लोकरे इ. सहभागी झाले होते. तसेच या शैक्षणिक उपक्रमासाठी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.