*कोंकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात भूगोल दिन संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये भूगोल दिन संपन्न झाला. याप्रसंगी प्रास्ताविक करताना भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजाराम पाटील म्हणाले की भूगोल विषयातील अमूल्य योगदान म्हणून श्री. सी.डी.देशमुख यांच्या स्मरणार्थ हा दिन भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. खऱ्या अर्थाने पूर्वी उत्तर ध्रुवावरील लोक उत्तरायणाची वाट पाहत असायचे तर आज उत्तर भारतामध्ये राहणारे लोक उष्णता मिळवण्याच्या दृष्टीने आतुरतेने वाट पाहतात. याच कालावधीमध्ये थंडीच्या दिवसांमधील महत्त्वाचा सण असल्याने लोक तीळ व गुळापासून बनवलेल्या पदार्थ खातात कारण मानवाच्या शरीराला या कालावधीमध्ये उष्णतेची गरज असते.असे सांगून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यात ज्येष्ठ भूगोल तज्ञ डॉ. हेमंत पेडणेकर म्हणाले की प्रत्येक विषयाला एक स्वतःचे रूप असते. भूगोलचे रूप सुद्धा एक निश्चित आहे. प्रत्येक गोष्टीच्या स्थानाला महत्त्व असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले. हृदयाच्या कोपऱ्यातून येणारे व्याख्यान नेहमी प्रभावी असते. शिक्षणाचा आणि कामाच्या स्वरूपाचा काहीही संबंध नसतो. व्यावसायिक जीवनात डोळसपणे वावरा. आपल्या अभ्यासातला पाया मजबूत असला पाहिजे. जगात जगण्यासाठी निसर्गाने प्रत्येकाच्या उपजीविकेचे साधन निर्माण केले आहे ते मिळवण्यासाठी क्षमता आपल्यात असली पाहिजे. उपग्रहावरील छायाचित्रांची संशोधन करण्यासाठी भूगोलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. ताण न घेता अभ्यास करा. ते यश आनंददायी असते. निराशावाद प्रगतीच्या आड येतो. प्रत्येक संधीचा उपयोग करा. प्रत्येक बाबतीत सकारात्मकता येते. असे प्रतिपादन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की जॉग्रफी हा शब्द कठीण वाटतो. पण भूगोल हा सोपा आहे. आज भूगोल समजून घेतला तर उद्याचे जागतिक तापमान वाढीचे अरिष्ठ टळेल. भूगोलच्या अभ्यासाने आपल्याला जगण्यासाठी आवश्यक स्त्रोत निर्माण करता येतील. माणसाचे जीवन सुसह्य होण्यासाठी भूगोल तज्ञांनी केलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूगोल विषयाच्या भितीपत्रिकेचे उद्घाटन डॉ. पेडणेकर सरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रा.विनोद पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्याचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.