*कोकण Express*
*खारेपाटण येथे बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील अतिशय महत्वाचे आणि झपाट्याने विकसित होणारे शहर असून भविष्यात वाहनांची वाढणारी वर्दळ लक्षात घेता येथे महामार्गावर बांधण्यात आलेला बॉक्सवेल हा खारेपाटण गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला न जोडता सर्व्हिस रोडला जोडण्यात आला असून बॉक्सवेलच्या दोन्ही बाजूने असणारे सर्व्हिस रोडसुद्धा अरुंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे एस टी बस तसेच अन्य मोठी खाजगी वाहने यांना बॉक्सवेल मधून बाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बांधण्यात आलेल्या अन्य ठिकाणच्या बॉक्सवेलपेक्षा खारेपाटण येथील बॉक्सवेल हा रुंदीने १२ मीटर व लांबीने २२ मीटर तर उंचीने ४.३०० मीटर एवढ्या खूप कमी आकाराचा बनविण्यात आला आहे.
याबाबत सत्यता पडताळण्याकरिता नुकतीच एक एस टी महामंडळाची बस डेमो म्हणून या बॉक्सवेलमधून चक्क घालण्यात आली व सर्व अधिकारी वर्गाच्यासमोर खात्री करून बघण्यात आली. खर तर खारेपाटण गावात तसेच बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासमोर बॉक्सवेल असायला हवा होता. तसे न झाल्यामुळे एस टी टन मारायला अडचण होत आहे त्यामुळे बॉक्सवेलमध्ये बस न घालता थेट मुख्य हायवेवर घातल्या जात असल्यामुळे हायवेवरून भरदाव धावणाऱ्या वाहनांमध्ये भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी हायवे प्राधिकरनाच्यावतीने खारेपाटण येथे बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलबाबत गंभीरतेने विचार करून योग्य ती उपाययोजना करून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खारेपाटण येथील नागरीकांकडून केली जात आहे.
याबाबत येथील ग्रामस्थानी नुकतीच महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय खारेपाटणचे अभियंता डी. जी. कुमावत, महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाचे जिल्हा वाहतूक निरीक्षक जी. बी. गोरे, के सी सी बिल्डकॉन कंपनीचे वरिष्ठ इंजिनियर द्विवेदी राजीवधर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खारेपाटण येथील बॉक्सवेलबाबत माहिती देऊन नाराजी व्यक्त केली.
खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्याना खारेपाटण येथे बोलावून बॉक्सवेलची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर, संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, योगेश पाटणकर, ग्रामस्थ लवू चव्हाण, निलेश गुरव, प्रमोद आंबेरकर आदी उपस्थित होते.
खारेपाटण येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशण कंपनीची ‘अति उच्च दाबाची विद्युत वहिनी’ महामार्गाला क्रॉस करून पॉवर हाऊस सेंटरला गेली असल्याने ती बदलता येत नसल्याचे कारण मुंबई-गोवा महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व ठेकेदाराकडून पुढे करून अशाप्रकारे चुकीचा बॉक्सवेल बनविण्यात आल्यामुळे त्याचा फटका खारेपाटण येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.