*कोकण Express*
*श्री गांगेश्वर खर्जादेवी नवरात्र उत्सव मंडळाचे वतीने उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील ,तळेरे येथील श्री गांगेश्र्वर खर्जादेवी नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा तसेच स्तुत्य उपक्रम हाती घेतले. विविध गुणवंतांचा गौरव तसेच दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्याना दत्तक घेतले जाणार असून अशा विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत केली जाणार आहे.
या मंडळाकडून सांघिक आणि वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. दोन्हीही स्पर्धांमध्ये मिळून सुमारे 150 ते 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. लहान मुलांपासून वयोवृध्द पर्यंत अनेकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या वेशभूषा स्पर्धेत अगदी 5 वर्षांपासून वयोवृध्द पर्यंत अनेकांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे मनोरंजन केले. यामध्ये आदिवासी महिला, धनगर, वेतोबा, पोलीस, भटजी काका, विविध ऐतिहासिक आणि धार्मिक पात्रांसह विविध राजकीय पात्रेही अगदी मनोरंजकतेने साकारली होती.
तसेच, तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यामिक विद्यालयाची एकांकिका आणि सिध्दार्थ जठार याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली. त्या सर्व कलाकारांचा गौरवही या मंडळाने केला. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर आणि शिक्षक यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
श्री गांगेश्र्वर खर्जादेवी नवरात्र उत्सव मंडळ तळेरे यांच्यावतीने यावर्षीपासून गरीब व होतकरू दोन मुलांना दत्तक घेतले जाणार असून त्यांचा येणारा शैक्षणिक खर्च हे मंडळ करणार आहे. दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासोबत या मंडळाचा हा उपक्रम अनुकरणीय ठरणारा आहे.