कोकणातील असंघटित लोकप्रतिनिधींमुळेच कोकणच्या विकासाला खीळ

कोकणातील असंघटित लोकप्रतिनिधींमुळेच कोकणच्या विकासाला खीळ

*कोकण Express*

*कोकणातील असंघटित लोकप्रतिनिधींमुळेच कोकणच्या विकासाला खीळ*

*कोरेचे दुपदरीकरण ही काळाची गरज* लोकप्रतिनिधींना घरी बसवा
-मोहन केळुसकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई -कोकण, किनारी सागरी हे राष्ट्रीय महामार्ग, कोकणातील पाटबंधारे, अंतर्गत जलमार्ग, पर्यटन विकास आदी विकासकामे गेली अनेक वर्षें रडत रखडत चालली आहेत. कोकणातील राजकारणातील पक्षीय हेव्यादाव्यांमुळे असंघटित असलेल्या लोकप्रतिनिधींमुळेच कोकणच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप करुन आगामी निवडणुकीत अशा लोकप्रतिनिधींना घरी बसविण्याचे काम मतदारांच्या हातात आहे, असे परखड मत कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी मुंबईत केले.

कोकण रेल्वे मार्ग हा देशातील उत्तर – दक्षिण भागांना जोडणारा असा कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणार्या प्रवासी गाड्यांसह मालवाहू गाड्यांची संख्या मोठ्या संख्येने
वाढत चालली आहे. कोल्हापूर – वैभववाडीसह कराड – चिपळून हे दोन रेल्वे मार्ग सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेही भविष्यात या मार्गांवर गाड्यांची संख्या कमालीची वाढणार आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा मार्ग महत्वाचा असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या कोरे महामार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी आता लोकप्रतिनाधींपेक्षा राज्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठविला पाहिजे.

कोकण विकास आघाडीची ४५ सावी सर्वसाधारण वार्षिक सभा दादर – मुंबईतील शारदाश्रम विद्या मंदिर मध्ये येथे झाली. संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस एकनाथ दळवी, चिटणीस प्रकाश तावडे, मुंबईचे माजी नगरसेवक विजयकुमार दळवी हे होते.

यावेळी कोविआचे मुख्य संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी मी मुंबईत असताना वयाच्या १८ व्याचवर्षी सुदैवाने कोविआच्या स्थापनेच्या वेळी योगायोगाने संपर्कात आलो. पत्र्याच्या झोपडीत राहणार्या मला अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १९८० मध्ये कोविआने कणकवली सारख्या अनोळखी गावात बस स्थानकात पाॅपकाॅर्न स्टाॅल सुरू करण्याचा परवाना मिळवून दिला. कोकणातील अनेक बस स्थानकांत तरुणांना कॅन्टीन, विविध प्रकारचे स्टाॅल मिळवून दिलेत असे सांगून कोविआच्या त्यावेळच्या संघर्षाच्या भूमिकेमुळे शासनाकडून विकास कामांचा धडाका सुरू होऊ लागला. हा इतिहास ज्ञात असलेली मंडळी आजही मोठ्या विश्वासाने कोविआचे सभासदत्व स्वीकारत आहेत.

लेखापाल पुनाजी गुरव यांनी कोकणातील तरुणांना गावातच शेती, बागायती आदी करण्यासाठी थांबवायचे असेल तर कोकणातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पुर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडले पाहिजे, असे परखड मत मांडले.

चौकट

*बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभूना घरी बसविले*

बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांचा वारसा चालविणारे बुद्धीमान व्यक्तीमत्व लेखापाल सुरेश प्रभू यांना खासदार नसतानाही केंद्रीय मंत्री मंडळात मानाचे रेल्वे खाते देण्यात आले. मात्र व्यवारिकद्धष्या बुलेट ट्रेनचे भूत भारतीय अर्थव्यवस्थेला परवडणारे नसल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळेच त्यांना खड्यासारखे दूर करण्यात आले. ही भारतीय लोकशाहीची शोकांतिकाच असल्याचे परखड मत भारतीय स्टेट बँक निवृत कर्मचारी संघटनेचे शशिकांत तोरसकर यांनी व्यक्त केले.

यावेळी रायपाटणचे विलास गांगण, मनोहर डोंगरे, चंद्रकांत आमरे, रमाकांत जाधव, सूर्यकांत शिर्सेकर, ॲड. एस. एन. भुजबळ आदींनी कोविआची पुढची वाटचाल ही सामाजिक जाण असलेल्या तरुणांच्या हाती आहे. तरुणांनी मोठ्या संख्येने विकास कामांच्या पुर्ततेसाठी कोविआच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे, असे आवाहन केले.

यावेळी ॲड. राजेंद्र केळुसकर यांनी उपस्थितांना बाजारातही अद्याप उपलब्ध न झालेली “कालनिर्णय २०२४” ही दिनदर्शिका भेट म्हणून दिली.
एकनाथ दळवी यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश तावडे यांनी समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!