*कोकण Express*
*बांदा जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे बुधवार १८ ऑक्टोबर रोजी अनोखे शाळा बंद आंदोलन*
*बांदा ः प्रतिनिधी*
येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक१ च्या कमिटी सदस्यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांची भेट घेत त्यांना शाळा बंद आंदोलन करणेबाबत सूचना पत्र दिले. तसेच यावेळी त्यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांना याबाबत सविस्तर कागदपत्रे सादर केली.
सिंधुदुर्गातील इतर जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ही कमी होत असताना बांदा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक१ ची पटसंख्या वर्षा-गणिक वाढत असून सद्यस्थितीत मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या देखील उपलब्ध नाहीत. तसेच आठ संगणक उपलब्ध असून देखील ते कार्यान्वित करण्यास जागा नाही. पोषण आहार, धान्य कोठार यांची योग्य सोय करता येत नाही. तसेच शासनाकडून गोरगरीब मुलांकरिता उपलब्ध असलेले कम्प्युटर लॅब व व्हर्चुअल क्लासरूम सारखी सुविधा जागे अभावी मुलांना उपलब्ध करून देता येत नाही. याकरिता जिल्हा परिषद मालकीची सदर शाळा इमारतीला लागून असलेली सेंट्रल प्रायमरी स्कूल ची इमारत उपलब्ध व्हावी म्हणून वारंवार शाळेकडून मागणी करण्यात आली. या सर्व बाबींचा विचार करून मा मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सदर इमारतीचा बेकायदेशीररित्या वापर करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा यांना याबाबत आदेश देऊनही सदर आदेशाला ही संस्था केराची टोपली दाखवते व दांडगाईने सदर आदेश मानत नाही.
तसेच सदर संस्थेने बेकायदेशीररित्या सदर ईमारत एका खाजगी ट्रस्टला व्यापाराकरिता वापरण्यास दिली व याची कोणतीही कल्पना मा. सीईओ, सिंधुदुर्ग यांना दिली नाही.
सबब, शासनाची मान्यता व लाभ घेऊन शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा दांडगाईने व मुजोरपणाने चुकीची धोरणे राबवत प्रत्यक्ष शासनाचे आदेश न मानणे याकरिता सदर दोन्ही संस्थांवर अतिशय कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे पुढील काळात कोणीही अशा प्रकारचा गुन्हा करण्यास धजावणार नाही.
मा मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी पारित व निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन व्हावे व गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या व उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हे शासनाचे धोरण पूर्ण व्हावे याकरिता बुधवार दिनांक१८/१०/२०२३ पासुन मुलांना शाळेत न पाठवून बेमुदत शाळा बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रत्नाकर आगलावे, पालक कमिटी उपाध्यक्ष श्री. गुरु कल्याणकर व कमिटी सदस्य सौ. संपदा सिद्धये, हेमंत दाभोळकर, हेमंत मोर्ये आदी उपस्थित होते.