*कोकण Express*
*निर्भिड होऊन पत्रकाराने आपली बाजू मांडल्यास समाज्याचा विकास होतो.-नारायण पांचाळ*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
पत्रकाराने परखडपणे पत्रकारिता केली तरच लोकशाही जिवंत राहू शकेल. त्यासाठी निर्भिडपणे बाजू मांडली पाहिजे, तरच समाजाचा विकास होईल आणि समाज पुढे जाईल. आणि पत्रकारांना पुढे जाण्यासाठी, त्याला न्याय, अधिकार मिळवून देण्यासाठी आमची युनियन देशपातळीवर 18 राज्यात काम करत आहे, असे प्रतिपादन जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी तळेरे येथील प्रज्ञांगणमध्ये आयोजित गुणगौरव समारंभात केले.
जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उद्घाटन युनियनचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख सतीश साटम, सिध्दार्थ जाधव, पत्रकार नरेश पाचलकर, गणेश चव्हाण, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड आदी उपस्थित होते.
यावेळी देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील पत्रकारांचे गुणवंत पाल्य, पत्रकार यांचा गौरव करण्यात आला. तसेच, तळेरे दशक्रोशितील विविध शैक्षणिक गुणवंत विद्यार्थि व संस्था मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना पांचाळ म्हणाले की, एकत्र येऊन सांघिक काम केल्यावरच पत्रकारांच्या हिताचे काम होऊ शकेल. त्यासाठी जागरूकता आपण केली पाहिजे. आपली एकजूट ही शासनाला दिसली पाहिजे, अन्यथा पत्रकार दुर्लक्षितच राहील.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेत योगदान अनमोल आहे. त्यांच्या नावाने पत्रकारिता विद्यापीठ सुरू करावे आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना केंद्र शासनाने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती पांचाळ यांनी दिली.
यावेळी सतीश साटम, सिध्दार्थ जाधव, नरेश पाचलकर यांच्यासह पालकांमधून जाकिर शेख, नितीन पाटील, श्री. ब्रम्हदंडे, राजेश जाधव, नवलराज काळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मारकड, सूत्रसंचालन सतीश मदभावे तर आभार उदय दुदवडकर यांनी मानले.