*कोकण Express*
*एसबीआय बँकेत व्यापाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी हिन वागणुक थांबवा..*
*व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आक्रमक, स्टेट बँकेचे वरीष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत व्यापारी महासंघाची बैठक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
एसबीआयच्या ग्राहक सेवा कामकाज व योजना या विषयाच्या अनुषंगाने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. व्यापारी बांधवांनी बँकेच्या शाखेत ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा व कर्मचाऱ्यांकडून दिली जाणाऱ्या हिन वागणुकी बद्दल उदाहरणांसह संताप व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यावर बँकेचे उपमहाप्रबंधक (व्यवसाय वृद्धी) रत्नागिरी सुजीत अंबुलकर यांनी दर्जेदार सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचेवतीने व कणकवली तालुका व्यापारी संघाचे पुढाकाराने गणेश मंगल हॉल, कट्टा, ता. मालवण येथे स्टेट बँक ऑफ इंडिया रत्नागिरी आचल अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापक व स्टेट बँकेचे वरीष्ठ स्तरावरील अधिकान्यासमवेत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उच्च दर्जाच्या ग्राहक सेवेची अपेक्षा करतानाच स्टेट बँक व सिंधुदुर्गातील व्यापारी वर्ग यांच्यातील संबंधाची सुधारणा झाली पाहिजे. भारताच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेशी जोडून घेण्याच्या दृष्टीने बँकेने शाखा स्तरावर ग्राहक मेळावे घेणे,
छोट्या व्यापाऱ्यां करिता अल्प प्रिमियम मध्ये विमा संरक्षण, शाखा तेथे ई गॅलरी, प्रत्येक शाखेत विभागीय कार्यालयचे फोन नंबर व पत्ता प्रसिद्ध करणे व ग्राहकांशी संबंधीत प्रत्येक कामासाठी लागणाऱ्या वेळेचा तक्ता आणि नागरिकांची सनद असा फलक ठळक पणे दिसेल अश्या ठिकाणी लावणे, पुरेशा प्रमाणात व आवश्यकते नुसार सुट्टी नाणी उपलब्ध करून देणे, शाखा निहाय जनसंपर्क अधिकारी उपलब्ध करून देणे, एटीएमची परिस्थिती सुधारणे व त्यात कायम पैसे उपलब्ध ठेवणे, जेष्ठ व आजारी ग्राहकांसाठी घरपोच बँकींग सेवा उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील सर्व शाखांत पैसे भरण्याची सयंत्रे उपलब्ध करून देणे, गृहकर्जासाठी आवश्यक सर्च रिपोर्टची फी बँक मार्फतच अदा केली म्हणजे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही व कर्ज प्रक्रिया सुलभ होईल, या सूचना व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.
यावेळी बँक अधिकाऱ्यांनी ग्राहक सेवेतील त्रुटीं बाबत व्यवस्थापनाला जाणीव आहे. त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू असून नजिकच्या
काळात यात लक्षणिय सुधारणा दिसेल. महासंघाने सुचविलेल्या सर्व सूचना बाबतीत पूर्णपणे लक्ष घालून सहकार्य करण्याची हमी बँकेचे उपमहाप्रबंधक (व्यवसाय वृद्धी) रत्नागिरी आंचल सुजीत अंबुलकर यांनी दिली. यावेळी सर्व शाखाधिकाऱ्यांनी आपल्या शाखेच्या माध्यमातून सर्वाना चांगली सेवा देण्याचीही हमी दिली.
यावेळी प्रविण शेवडे, नितीन तायशेटे, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, विलास कोरगांवकर, राजा राजाध्यक्ष, निलेश धडाम, विवेक नेवाळकर, नितीन वाळके यांनी ग्राहकांच्या समस्या मांडल्या.
या चर्चेला बँकेच्या महाप्रबंधक ग्रेस मॅडम यांनी उत्तर देतांना ग्राहक सेवेतील असंख्य अडचणी असतांनाही व्यापारी बांधवांनी ज्या पोटतिडकीने भावना मांडल्या त्यातून त्यांची स्टेट बँकेबद्दलची आपुलकीच दिसून येते. या आपुलकीचा सन्मान करून स्टेट बँक व सिंधुदुर्गातील व्यापारी बाधव यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी बांधील आहोत, असे सांगितले.
वेळी कट्टा व्यापारी संघाचे वतीने कट्टा बाजारपेठेतील एटीएम सुविधेबाबत निवेदन देण्यात आले. तर दोडामार्ग येथे बँकेची शाखा सुरू करण्याबाबतच्या यापुर्वी दिलेल्या निवेदनानुसार कार्यवाही सुरू आहे. नजिकच्या काळात हे काम मार्गी लागेल असा विश्वास श्रीम. ग्रेस यांनी व्यक्त केला.
या वेळी बँकेच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण बैठकीचे सुत्रसंचलन महासंघाचे श्री. अरविंद नेवाळकर यांनी केले.