मालवणात १९ व २० ऑगस्टला ‘झिम्माड’ कला -साहित्य महोत्सवाचे आयोजन

मालवणात १९ व २० ऑगस्टला ‘झिम्माड’ कला -साहित्य महोत्सवाचे आयोजन

*कोकण Express*

*मालवणात १९ व २० ऑगस्टला ‘झिम्माड’ कला -साहित्य महोत्सवाचे आयोजन*

*मालवण ः प्रतिनिधी*

कायद्याने वागा लोकचळवळीशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने दि. १९ ते २० ऑगस्ट असा दोन दिवसीय ‘झिम्माड’ – मराठी कवितेच गणगोत हा कला- साहित्य महोत्सव मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील कला, चित्र, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून परिसंवाद, मुलाखत, मुक्तसंवाद, चित्रसंवाद, कविसंमेलन यांचा समावेश आहे. मालवण सारख्या प्रेरक व ऐतिहासिक शहरात आणि निसर्गाच्या सानिध्यात यावर्षी हा महोत्सव होत असल्याने साहित्यिक व कलाकार मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष किशोर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

झिम्माड महोत्सवाबाबत आयोजकांची मालवण बॅ. नाथ पै सेवांगण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष किशोर कदम, साहित्यिक सिद्धार्थ तांबे, राजेश कदम, साहित्यिका कल्पना मलये कवयित्री सरिता पवार, उपस्थित होते.

यावेळी किशोर कदम, सिद्धार्थ तांबे व सरिता पवार यांनी महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट केली. कायद्याने वागा लोकचळवळीच्या मार्गदर्शनाखाली साहित्यिकांच्या व्हाट्सअप ग्रुप मधून स्थापन झालेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने पुणे, दापोली, माणगाव, कासारा या ठिकाणी झिम्माड महोत्सव घेण्यात आला. यावर्षी ५ वा महोत्सव मालवणात आयोजित केला आहे. पावसाळ्यात हा महोत्सव आयोजित केला जातो. झिम्माड काव्यसमुहाने समाजमाध्यमांच्या आधारे महाविद्यालयीन काव्यस्पर्धा, अभिवाचन, ऑनलाईन कविसंमेलन, ऋतुरंग, बोलू कविता, अभिव्यक्ती चर्चा यासारखे विविध उपक्रम राबवून साहित्य वर्तुळात आपला एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

या महोत्सवाचे उद्घाटन रविवार २० ऑगस्टला सकाळी ८.४५ वाजता मराठीतील नामवंत लेखक राजन गवस यांच्या हस्ते होणार आहे. हा महोत्सव ज्येष्ठ कवी महेश केळूसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या महोत्सवात शनिवार १९ ऑगस्टला सायं. ७ वा. ऐसपैस हा मुक्तसंवाद कार्यक्रम लता गुठे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात नितीन शेठ, संदीप जालगांवकर, शरद कुहाडे, संदीप वाघ, संग्राम दावनावचे, नीलेश शिनलकर, संगीता लोहारे, सुहास मळेकर, राकेश पद्माकर मीना, कपिल खंडागळे, नीलम जाधव, प्रतीक्षा बनसोड, ओमकार परब, सुधा लोकरे, अनिल सावंत, सुनील देवळेकर यांचा सहभाग असून सूत्रसंचालन जीतेंद्र लाड करणार आहेत. रात्री ८ वाजता ‘स्टेथोस्कोप हा आरोग्य विषयक परिसंवाद होणार असून वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र राठोड, भूलतज्ज्ञ डॉ. नरसिंग इंगळे यांच्या सहभाग असून राज असरोंडकर यांचा सुसंवाद असेल.

दि. २० रोजी सकाळी ८.४५ वा. झिम्माड महोत्सव २०२३ मराठी कवितेचं गणगोत चे उद्घाटन मराठी नामवंत लेखक राजन गवस यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी महेश केळुसकर हे असणार आहेत. समीक्षक केशव तुपे, लेखिका रश्मी कशेळकर, कवी तथा गीतकार विनायक पवार, सामाजिक कार्यकर्ते राज असरोडकर, स्वागताध्यक्ष किशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल. सूत्रसंचालन राजेश कदम करतील. सकाळी ९.४५ वा. कॅनव्हास हा कार्यक्रम होणार आहे. यात चित्रकार नामानंद मोडक केशव कासार यांच्या सहभाग असून कवी प्रथमेश पाठ हे त्यांच्याशी सुसंवाद साधतील. १०.४५ वा. ‘अभिव्यक्तीची ऐशीतैशी हा कार्यक्रम होईल. यात लेखक प्रवीण बांदेकर, माध्यम संशोधक कुंदा प्र. नी. सामाजिक कार्यकर्त्या सीरत सातपुते, कवयित्री प्रतिभा सराफ, अभिनेता मंगेश सातपुते, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हिरा मधुकर यांचा सहभाग असून संजय शिंदे त्यांच्याशी सुसंवाद साधतील.

२० रोजी दुपारी ११ वा. पहिले कवी संमेलन अरुण गवळी यांच्या अध्यक्षतेखाली होईल, यात अनुजा जोशी, वीरथवल परब, गोविंद काजरेकर, आनंद लोकरे, लता गुठे, वृषाली विनायक, प्रथमेश पाठक, कविता राजपूत, सिद्धार्थ तांबे, कल्पना बांदेकर, प्रिया मयेकर, जीतेंद्र लाड, नंदू सावंत, कल्पना मलये, सोनाली जाधव यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन कविता मोरवणकर या करणार आहेत. दुपारी २ वा. दुसरे कविसंमेलन शशिकांत तिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात अजय कांडर, अनिल धाकू कांबळी, ज्योत्स्ना राजपूत, डॉ. राजेंद्र राठोड, डॉ. नरसिंग इंगळे, शिवराम भोंडेकर, सुधीर चिते, राजेश कदम, श्रीकांत पेटकर, शालिनी आचार्य, संजय शिंदे, संध्या लगड, सुनील शिरसाट, जयश्री देशमुख, विशाल अंधारे, सुधाकर चव्हाण, जनार्दन सताणे यांचा सहभाग असून सूत्रसंचालन सरिता पवार करणार आहेत. दुपारी ३ वा. झिम्माड महोत्सवाचा समारोप होणार असून समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगकर्मी सुधीर चित्ते हे करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महोत्सवात महाराष्ट्रसह गोव्यातील मान्यवर कवी, साहित्यिक यांचा सहभाग असणार आहे. तसेच सिंधुदुर्गातील स्थानिक साहित्यिकही यात सहभागी होणार आहेत. तरी साहित्यप्रेमीनी या महोत्सवात उपस्थित राहून विविध साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन यावेळी स्वागताध्यक्ष किशोर कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!