प्रजासत्ताक दिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा

*कोकण Express*

*प्रजासत्ताक दिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा…*

*हिंदू जनजागृती समितीची मागणी; वेंगुर्ले तहसीलदारांना निवेदन…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे. येणाऱ्या २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत कुणाकडूनही प्लास्टिकचे झेंडे घेऊन किंवा तोंडावर तिरंग्याच्या रंगातील मास्क लावून आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेक जण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी/ प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/ २०११) दाखल केली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले.
यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार ‘राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे’, हा ध्वजाचा अवमानच आहे, तसेच ‘राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१’चे उल्लंघन आहे. त्यामुळे ‘तिरंगा मास्क’ ची खरेदी न करण्याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असतांना हातातील राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये, यासाठी अनेक लाठ्या खाल्ल्या, अत्याचार सहन केले, राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये, यासाठी क्रांतिकारकांनी प्रसंगी प्राणाचेही बलीदान दिले. असे असतांना लहान मुलांना खेळण्यासाठी घेतलेले, वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झेंडे, रस्त्यावर आणि नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, पायदळी तुडवले जातात. यामुळे राष्ट्रध्वजासाठी बलीदान करणाऱ्या क्रांतिकारकांची एक प्रकारे क्रूर चेष्टाच होते. काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे स्वतःचा चेहरा रंगवतात, तसेच राष्ट्रध्वजाच्या रंगातील कपडे घालून फिरतात. यांमुळेही राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तरी ‘राष्ट्रध्वजाचा अवमान वा विटंबना होईल, अशा प्रकारच्या कृती कोणी करू नये.
तरी वेंगुर्ले तालुक्यात कुठेही प्लास्टिकचे झेंडे तिरंगी रंगाचे मास्क विक्री होणार नाही यासाठी संबंधित व्यापारी वर्गाला सूचना द्यावी, असे या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे तसेच वेंगुर्ला हायस्कूल आणि वेंगुर्ल्यातील खर्डेकर महाविद्यालय येथेही समितीने देऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे अशी मागणी केली आहे. यावेळी समितीचे गोपाळ जवलेकर, प्रवीण कांदळकर, महेश जवलेकर, दाजी नाईक, परशुराम गोरल, स्वप्नील ठाकुर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!