*कोकण Express*
*परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हॅल्मेट सक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जाचक दंडवसुली!*
*मोटर वाहन कायद्यातील अन्य तरतुदी व नियमांना बगल देऊन फक्त हँल्मेटचे तुणतुणे वाजवणाऱ्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना मनसे जाब विचारणार..!*
*आरटीओ कार्यालयाच्या असंवेदशील कारभारा विरोधात लवकरच “धडक” आंदोलन.. प्रसाद गावडे*
ओरोस आरटीओ कार्यालयात दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या जिल्ह्यातील सर्वसामान्य वाहनधारकांकडून हॅल्मेट सक्तीच्या नावाखाली जाचक दंड वसुली केली जात असून जनतेला निव्वळ त्रास देण्याचे काम सिंधुदुर्ग परिवहन विभागाकडून होत आहे.एकीकडे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे आरटीओच्या दलालांना मात्र कारवाईमधून सूट देण्यात येत असल्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत.हॅल्मेट वापराबाबत मोटार वाहन कायद्यातील तरतुदी दाखवून जनतेकडून जाचक वसुली करणारे आधिकारी त्याच अधिनियमातील इतर तरतुदींकडे दुर्लक्ष करत मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष का करतात व सामान्य जनतेची लूट करतात असा सवाल करत मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत आरटीओ कार्यालयाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. रस्ते निर्मिती करताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी न करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला “नियमावली” का शिकविली जात नाही, ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या व टीपी नसणाऱ्या परराज्यातील गाड्यांवर कारवाई का होत नाही, एजंटांना हाताशी धरल्याशिवाय जनतेची कार्यालयीन कामे का पूर्ण होत नाहीत, आरटीओ कार्यालयाच्या बाहेर सेवा दरपत्रक का प्रसिद्ध केले जात नाही, दुचाकीची विक्री करतानाच हॅल्मेट देणे नियमाधीन असताना शोरूम विक्रेत्यांकडून नियमाची अंमलबजावणी केली जात नसल्याने आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही,वेंगुर्ले गुन्हा दाखल प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर परिवहन विभागाने कोणती प्रशासकीय कारवाई केली आदी प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,सिंधुदुर्ग कार्यालयावर “धडक” देणार असून वाहनधारकांनी देखील आरटीओ संबंधीत आपल्या व्यथा व गाऱ्हाणी मांडण्याचे आवाहन मनसेकडुन करण्यात येत आहे.