*कोकण Express*
*जे स्वतः निवडून येऊ शकत नाही, त्यांनी हवेत गोळीबार करू नये*
*माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी नेते अबीद नाईकांचा अमित सामंतांना टोला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दी सिंधुदुर्गात एकही राष्ट्रवादीचा सरपंच बसू शकला नाही, तसेच स्वतः निवडून
येण्याची त्यांची पात्रता नाही, अशांनी हवेत गोळीबार करू नये, असे प्रत्युत्तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे नाव न घेता दिले आहे. दरम्यान ज्यांना मी क्रियाशील सदस्य आहे हे माहीत नाही. ते पक्ष काय
वाढवणार? असा चिमटा काढत सदस्य नोंदणीची पुस्तके उशाला घेऊन झोपले त्याच्याबद्दल आणखीन काय बोलावे ? अशीही बोचरी टीका
त्यांनी केली आहे.
नाईक हे अजित पवार गटात सामील झाले आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक हे राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्य नव्हते, असा दावा अमित सामंत यांनी केला होता. त्याला नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज प्रत्युत्तर दिले आहे.
त्यात असे नमुद केले आहे की, जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे दुर्दैवी आहे. पक्षाकडून सदस्य करण्यासाठी दिलेली पुस्तके उशाला घेऊन झोपणाऱ्यांना कोण सदस्य आहेत आणि कोण नाही ते काय कळणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर पक्षाकडून माझ्याकडे देण्यात आलेली पुस्तके सदस्य करून मी पक्षाकडे जमा केलेली आहेत. त्याची यादी ही माझ्याकडे आहे. मी स्वतः ही सदस्य आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य कोण आहेत ? पदाधिकारी कोण आहेत ? हे ज्यांना माहीत नाही.. त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत पक्षाने कधीच उभारी घेतली नाही. एकाही ग्रामपंचायतीत पक्षाचा सरपंच बसू शकला नाही तर स्वतःची निवडून येण्याची पात्रता नसणाऱ्यांनी आता हवेत गोळीबार करणे थांबवावे, असा टोला त्यांनी लगावला. तर त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत मनमानी कारभार करून पक्षाची हानी करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केला आहे.