*कोकण Express*
*योग आपल्याला स्वतःशी जोडतो: डॉ.आत्माराम कांबळे*
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व अजीवन अध्ययन विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक योगा दिन उत्साहपूर्ण साजरा करण्यात आला.
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, केंद्रीय आयुष्य मंत्रालय आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून मिळालेल्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योगा दिन 82 स्वयंसेवकांच्या सहभागातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जगभरात योगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या दिवशी जगातील अनेक देशांतील लोक एकत्र येतात आणि योग दिवस साजरा करतात.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची (Yoga) सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा पुढाकार घेतला. 27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली. भारतातर्फे संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. एखादा प्रस्ताव एवढ्या कमी वेळेत म्हणजे 90 दिवसाच्या आत एवढ्या मोठ्या देशांनी स्वीकारण्याची पहिलीच वेळ होती.
भारतीय आयुष मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम निवडली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’ (Yoga For Humanity) ही आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम म्हणून निवडण्यात आली आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रात्यक्षिक व भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.’योगा फॉर ह्युमॅनिटी’ (Yoga For Humanity) ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग आहे. ज्ञान संपादन करणे आणि नंतर ते पुढच्या पिढीला देणे ही क्षमता केवळ मानवाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळेच ज्ञानाच्या विविध शाखा निर्माण झाल्या. आजच्या आधुनिक युगात, व्यग्रतेमध्येही योगासनं शरीर निरोगी आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यासोबतच योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. रोज योगासनं केल्यानं शारीरिक आणि मानसिक उर्जेच्या विकासासोबत तणाव आणि नैराश्यही कमी होतं. म्हणून शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी योगा एक वरदान असे म्हणने वावगे ठरणार नाही, तसेच योग आपल्याला स्वतःशी जोडतो असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी केले.
या प्रसंगी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी समन्वयक श्री. वसीम सय्यद, कला शाखा प्रमुख सहा. प्रा. प्रकाश शिंदे, वाणिज्य शाखा प्रमुख सहा. प्रा. मोहम्मदअली मुन्शी, मराठी विभाग प्रमुख सहा. प्रा. रश्मी देसाई, शैक्षणिक व विद्यार्थी आणि कर्मचारी कल्याण समिती प्रमुख आणि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. प्रज्योत नलावडे, संगणक प्रयोगशाळा सहा. प्रा. नमिरा मुजावर व प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विद्यार्थी प्रतिनिधि कु. आरती पवार, कु. अमृता जगताप, कु. हर्षाली सावंत, कु. पृथ्वीक सावंत, कु.अजय शेलार, कु. सुरज गोठणकर आदी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेऊन ही योगशाळा यशस्वीरित्या संपन्न केली. या योगशाळा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून कु. अपूर्वा खानविलकर यांनी भुमिका बजावली.