*कोकण Express*
*शॉर्टसर्किटमुळे तळवडे येथे मांगराला भीषण आग…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे तळवडे येथे भरवस्तीत असलेल्या मांगराला भीषण आग लागली. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेरवाडी येथे घडली. या आगीत मांगराच्या छपरासह आतील सामान जळून खाक झाल्यामुळे शेतकरी उत्तम भगवान परब यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब त्याठिकाणी दाखल झाला आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य दादा परब आणि मंगलदास
पेडणेकर यांनी दिली. घटनेची अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास परब यांच्या मांगरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. पावसाच्या पूर्वतयारीसाठी आत मध्ये जळाऊ सामान भरलेले असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यात आतील सामानासह मांगराचे छप्पर जळून खाक झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आग विजविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे पदाधिकारी देखील मदतीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र आग आटोक्यात येत नसल्यामुळे तात्काळ सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब त्या ठिकाणी पाचरण करण्यात आला आहे. भर पावसाळ्यात हा प्रकार घडल्यामुळे परब कुटुंबासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे…