*कोकण Express*
*शिव- साम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाटचे अध्यक्ष सचिन नाकाडी यांचे अपघाती निधन !*
*फोंडाघाट युवाई मध्ये शोक व्यक्त—-*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट येथे स्थायिक झालेले, जुने जाणते वाळू व्यवसायिक स्व. शंकर नाकाडी यांचे सुपुत्र सचिन ( ४० ) वर्षे यांचे अपघातानंतर बांबुळी- गोवा येथे उपचारादरम्यान रविवारी दुपारी दुःखद निधन झाले.
शनिवारी कणकवलीहुन फोंडाघाट येथे दुचाकीने येत असताना, जानवली- रातांबीचा व्हाळ जवळ,गुरे आडवी आल्याने आणि सचिनचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. त्यामुळे सचिन महामार्गावर डोक्यावरच आपटल्याने गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी सचिनला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर परिस्थिती पाहता त्याला गोवा- बांबुळी येथे तातडीने हलविण्यात आले. मात्र औषधोपचार सुरू असतानाच सचिनची प्राणज्योत मालवली.
फोंडाघाट मध्ये गड-दुर्ग- घाट स्वच्छता मोहीम व पुनरुज्जीवन, माहिती आणि प्रसिद्धी सर्वसामान्य मावळ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शिव- साम्राज्य प्रतिष्ठान संस्थेचे ते संस्थापक- अध्यक्ष होते. त्यांनी सहकाऱ्यांसह अनेक मोहिमा, शिवजन्म सोहळा, शोभायात्रा, ढोल पथक, शिवराज्याभिषेक सोहळा यांचे यशस्वी नियोजन करून युवाई मध्ये लोकप्रियता मिळवली होती. नम्र, मदतीसाठी धावून जाताना कशाचीही पर्वा न करण्याचा बेधडक स्वभाव, यामुळे त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. वडिलांच्या पश्चात त्यांनी स्वतःचा मायनिंगचा धंदा पुढे सुरू ठेवला होता.
त्यांच्या पक्षात पत्नी,दोन मुली, आई,भाऊ, भाऊजय असा मोठा परिवार असून पत्रकार महेश सावंत यांचे ते मेहुणे होत. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीत शोक व्यक्त होत असून, सोमवारी त्यांचे पार्थिव फोंडाघाटला आल्यानंतर पटेलवाडी पर्यंत, अंत्ययात्रेत सर्व स्तरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून सचिनला श्रद्धांजली वाहिली…..