शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!

शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!

*कोकण Express*

*”शासन आपल्या दारी” इव्हेंटने फोडल्या “घामाच्या धारी.!”*

*प्रशासकीय यंत्रणांकडून गर्दीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांना जमवण्याची नामुष्की ?*

*लाखो रुपये उधळून केलेला इव्हेंट म्हणजे “चाराणेची कोंबडी अन बारण्याचो मसालो” असल्याची लाभार्थ्यांमध्ये चर्चा.. मनसेची टीका*

महाराष्ट्र शासन आयोजित कुडाळ येथील “शासन आपल्या दारी” इव्हेंटमुळे जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता वेठीस धरली जात असून उष्माघातामुळे नागरिकांसह कर्मचारी देखील प्रचंड हैराण झाले आहेत.प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गर्दी जमवण्यासाठी मागील वर्षी लाभ दिलेले लाभार्थी देखील कार्यक्रमास उपस्थित राहावे यासाठी संपूर्ण यंत्रणाच जणू कामाला लावली. मागील पूर्ण आठवडा प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण वेळ व कार्यालयीन कामकाज कार्यक्रमाच्या नियोजन बैठकांमध्ये घालवल्याने सर्व सामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत. सध्या 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन्सचा कार्यकाल असल्याने त्यासाठी लागणारे दाखले, प्रशासकीय यंत्रणा कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त असल्यामुळे मिळवताना पालकांना मात्र प्रचंड मनस्ताप होत आहे. वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करून शासकीय योजनांचा इव्हेंट साजरा करण्यापेक्षा शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार कमी करून प्रशासकीय कारभार सुधारणे, कामचुकार कर्मचाऱ्यांनावर कारवाई करणे, शासन निधी खर्चून झालेल्या कामांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांवर वचक ठेवणे, पारदर्शी व लोकाभिमुख कारभार व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना करणे असे कार्य अभिप्रेत असताना प्रत्यक्षात जनतेच्या पैशांवर असे राजकीय इव्हेंट साजरे केले जाणे लोकशाही व्यवस्थेला साजेसे नाही. जे लाभार्थी या कार्यक्रमांमध्ये नव्याने पुढे आणले जात आहेत त्यांचे लाभ अशा इव्हेंटसाठी आत्तापर्यंत जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले गेले का हा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होतो. जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी मान्सूनपूर्व तयारीला लागला असताना पावसाच्या तोंडावर इव्हेंटसाठी अशाप्रकारे वेठीस धरणे योग्य नाही. मुळात शासन आपल्या दारी म्हणजे प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्य जनतेच्या दारापाशी येऊन लाभ सुविधा देणे असे अभिप्रेत असताना इथे तर चक्क जिल्ह्याभरातुन गावागावातील लाभार्थ्यांना भर दुपारच्या सुमारास एकत्र जमवून गर्दी करणे म्हणजे पाण्यातून आगीत टाकल्यासारखेच आहे. इव्हेंटवरील खर्च व लाभाची रक्कम याची तुलना केल्यास हवामान खात्याचा उच्चांक उष्माघाताच अहवाल असताना निव्वळ राजकीय स्टंटबाजीसाठीच जनतेला वेठीस धरले गेले असून आगामी काळात असे भव्य इव्हेंट साजरे करण्यासाठी अधिकारी वर्ग लाभाच्या योजना प्रलंबित ठेवून काम करायला लागला तर त्याचा त्रास उलट जनतेलाच सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने महामार्गावरील जाचक टोल प्रश्न, प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता,बेरोजगारी ग्रासलेले युवकांचे प्रश्न,पर्यटन जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते,आरोग्य यंत्रणांमधील डॉक्टरांची कमतरता असे जिल्हा वासीयांच्यासमोरील ज्वलंत प्रश्न सुटणार आहेत अशी खोचक टीका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!