*कोकण Express*
*आरोग्याच्या बाबतीत बेशिस्त खपवून घेणार नाही*
*आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन घेतला आढावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यात युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यामुळे बेशिस्त कारभार कोणत्याच खात्याचा चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयात जनतेच्या आरोग्य संदर्भात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे आणि जिल्ह्यातील संदर्भातील प्रश्न आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या समक्ष जिल्हा शल्य चिकित्सक यांना बसून हे प्रश्न सोडवले जातील येत्या काही दिवसात फरक दिसेल. जे डॉक्टर सेवा देण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल आणि सेवेत झालेला फरक लवकरच दिसेल असा विश्वास आम. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाकाजा आढावा घेण्यासाठी आम. नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी. एस. नागरगोजे, अतिरीक्त शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, अण्णा कोदे, डॉ. चौगुले व इतर उपस्थित होते.
आपणाला रुग्णांना सेवा द्यायची आहे की नाही. प्रत्येक पेशंट बाहेर हलवावा लागतो. रुग्णालयातील फोन बंद, डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत माहिती फलक नाही. ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित नाही. ऑर्डर दिलेले डॉक्टर हजर नाहीत, असाच सारा कारभार असेल तर आपण गप्प बसणार नाही. हे सारे काम दर्जाहीन सुरू आहे. अधिवेशनावेळी या तेथे आरोग्य मंत्र्यांसमोरच हे प्रश्न निकाली लावू अशा स्पष्ट सूचना आम. नितेश राणे जिल्हा शल्य चिकीत्सकांना दिल्या.
यावेळी आम.नितेश राणे यांनी डॉक्टरांच्या उपस्थितीबाबत विचारणा केली. यावेळी काही डॉक्टर हजर होऊन बॅगा आणण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. तर ऑर्डर दिलेल्यांपैकी काही हजर नाही. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत याला शिस्त म्हणायची का ? असा सवाल केला. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवक व इतरांनीही काही समस्यांकडे लक्ष वेधले. जर हे कामकाज असे चालत असेल तर तुमचे लक्ष कुठे आहे? तुम्ही काय करता ? असा सवाल श्री. राणे यांनी केला. वैद्यकीय अधिक्षक सातत्याने गैरहजर कसे ? हा सारा प्रकार शिस्तीला धरून नसल्याचे ते म्हणाले,
ऑक्सीजन प्लांट उभारला, पण ऑक्सीजन सुरू नाही. लँडलाईन फोन बंद आहे. माहिती फलक नाही, अशा साध्या गोष्टीही नसतील तर कसे काय कामकाज चालणार ? वैद्यकीय सेवेबाबत आपण तडजोड करणार नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल चालविणारे डॉक्टर सरकारी काम करत असतील तर ते प्रामाणीकपणे होणार नाही. त्यामुळे हे योग्य नाही, असा प्रकार होता कामा नये. तसेच आक्सीजन प्लांट जर चालू नसेल तर त्याबाबतही प्रशासनाने काही भूमिका घ्यावी, याबाबत आपण काम करू या साऱ्या कामकाजाचा विचार करता ते दर्जाहीन आहे. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. पण आता सरकार बदलले आहे. उद्भव ठाकरे सरकारच्या काळात जे चालत होते, ते आता चालणार नाही. ज्या गोष्टी नजरेसमोर आल्यात त्या आरोग्य मंत्र्यांसोबत शल्यचिकीत्सकांना घेऊन बसणार असून या सर्व सुविधा मिळण्याच्यादृष्टीने जो काही फरक असेल तो तुम्हाला आठवडाभरात दिसेल, असेही आम. राणे म्हणाले.
उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज सुधारणा करण्यासाठी आपले प्राधान्य राहिल. सद्यस्थिीत ऑनकॉल व अर्धवेळ डॉक्टरांच्या सेवा रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून घेण्याबाबत कळविले होते. परंतु, या सर्व सेवा पुर्वीप्रमाणे सुरू राहितील. आयपीएचएस अंतर्गत आम्ही अनुदानाची मागणी केलेली असून ते लवकरच मिळेल. तसेच क्लेरीकल पदांच्या भरतीबाबत उपसंचालकांना कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी. एस. नागरगोजे यांनी दिली.
डॉ. नागरगोजे म्हणाले, वर्ग ४ च्या पदांबाबतची भरती शासनाकडून सुरू आहे. तोपर्यंत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालय १०० बेडचे असून दोनच क्लेरीकल पदे कार्यरत आहेत. रिक्त पदांच्या भरतीबाबत उपसंचालकांना कळविण्यात आले आहे. फार्मासिस्टची तीन पदे मंजूर असून एकच कार्यरत असल्याने होणारी अडचण पाहता अजून एक देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ. नागरगोजे म्हणाले.