*कोकण Express*
*जेष्ठ नागरिक यांच्या समस्या , हक्क आणि कायदा मार्गदर्शन सभा संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांना कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क आणि कायदे याची माहिती घेणे व त्यानुसार मार्गदर्शन करण्याकरिता बैठक आयोजित केली होती.
यावेळी जेष्ठ नागरिकांच्या समस्या काय आहेत, मूलभूत गरजा कोणत्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांबाबत कायदे काय आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वयोवृद्ध पालकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार या संदर्भात यावेळी माहिती देण्यात आली.
जेष्ठ नागरिक सेवा संघ तसेच आम्ही कणकवलीकर सदस्य या बैठकीला उपस्थित होते. ज्या पालकांवर पाल्य अन्याय, अत्याचार करतात किंवा पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे अलीकडचची मोठी समस्या म्हणजे पैसा आणि प्रॉपर्टी.! असे प्रकार सेवा निवृत्त झालेल्या पालकांच्या बाबतीत अन्याय झालेला दिसून येतो. मुले पालकांचा पैसा आणि प्रॉपर्टीसाठी सांभाळ करतात. मात्र प्रामाणिकपणे पालकांचा सांभाळ करणारी मुले फार कमी प्रमाणात दिसून येतात.
मात्र ज्येष्ठ नागरिक पालकांवर अन्याय अत्याचारांसाठी आता आई – वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम २००७ तसेच एक महिन्यापर्यंत कारावास व ५००० रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे वाढते अन्याय पाहता त्या संदर्भात जनजागृती होणे काळाची गरज असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी यावेळी बैठकी दरम्यान सांगितले.
दरम्यान दादा कुडतरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या देखील पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याकडे मांडल्या. तसेच बसमध्ये, रेल्वे स्टेशन, बँका, पोस्ट ऑफिस या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना योग्य प्रकारे सुविधा मिळत नसल्याचे देखील सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये, बँकांमध्ये जिन्याने वर – खाली जाणे अवघड असते. त्याबाबत देखील त्यांना सोयी – सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी देखील यावेळी केली. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन याबाबतची माहिती देणे गरजेचे आहे, असेही कुडतरकर यांनी सांगितले.
दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी आपण या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांची ही एकदा बैठक घेऊन त्यांनाही योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि सूचना करणार असल्याचे सांगितले.
यावेळी दादा कुडतरकर, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, विजय गांवकर , सहा.पोलीस निरीक्षक सागर खंडागळे , हवालदार किरण मेथे , ज्येष्ठ नागरिक संघाचे मनोहर पालयेकर , राजेश रेगे , राजेश राज्याध्यक्ष , राजू पारकर , दयानंद उबाळे , विलास कोरगावकर , बाळू मेस्त्री , नितीन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.