*कोकण Express*
*नडगीवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा संमेलनाचा थाटात शुभारंभ: मुलींना क्रीडा क्षेत्रात मर्दानी खेळ आत्मसात करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित करावे- स्नेहा कोकणे पाटील*
*कासार्डे ; संजय भोसले*
आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तीन दिवसीय वार्षिक क्रीडा संमेलनाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला बॉडी बिल्डर स्नेहा सचिन कोकणे पाटील यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारी प्रमुख अतिथी स्नेहा कोकणे पाटील, आदर्श एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मनोज गुळेकर व अन्य मान्यवरांचे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त स्वागत केले. संगीतमय लेझीम नृत्याने त्यांचे मार्गस्थ स्वागत करीत त्यांना व्यासपीठावर विराजमान केले. दरम्यान मार्गात तीन ठिकाणी प्रमुख अतिथी आणि संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून फनी गेम्स खेळून क्रीडा संमेलनाच्या उत्साहाला उधाण आणले. येलो हाऊस, ग्रीन हाऊस, ब्ल्यू हाऊस व रेड हाऊस या पथकांनी नील लोकरे आणि मोहविश मुल्ला या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली फहाद सारंग, झोया पटेल या क्रीडा प्रमुखांच्या हस्ते ध्वज संक्रमण करीत नियमित संचलन केले. या संचालनादरम्यान यलो हाऊस, ग्रीन हाऊस, ब्लू हाऊस व रेड हाऊस यांचे नेतृत्व अनुक्रमे ओम मोरे, राधिका पांचाळ, अब्दुल गफूर मुकादम व ईशा गिरकर यांनी केले. याप्रमाणेच प्रमुख अतिथी स्नेहा कोकणे पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योतीची मशाल प्रज्वलित करून क्रीडाशिक्षक सुयोग राजापकर यांच्या हस्ते सुपूर्द केली. पुढे ती क्रीडा मैदानात नील लोकरे, मोहविश मुल्ला, फहाद सारंग, झोया पटेल, प्रथमेश अडुळकर, अल्मस मुकादम, सुजल मोहातो, अमिना पटेल या प्रतिनिधींनी धावून संक्रमित केल्यानंतर क्रीडा शिक्षक सुयोग राजापकर यांनी ती स्थानापन्न केली.
व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर प्रमुख अतिथी स्नेहा कोकणे पाटील तसेच मान्यवर सचिन कोकणे यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोज मुळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवर पराग शंकरदास यांनी मनोज गुळकर यांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. सर्व मान्यवर पराग शंकरदास, प्रवीण लोकरे, परवेज पटेल, राजेंद्र ब्रह्मदंडे, रघुवीर राणे, मोहन कावळे, आशिष भोसले, भावेश शिरवडकर, नयन दुदवडकर यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक सरदार निकम यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. मुख्याध्यापक सरदार निकम यांचेपुष्पगुच्छ प्रदान करून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुयोग राजापकर यांनी स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवर उपस्थित पालक व प्रेक्षक यांच्या स्वागतपर नयनरम्य विस्मयजनक क्रीडा नृत्य सादर झाले.
शपथ ग्रहण कार्यक्रमात स्नेहा कोकणे पाटील यांनी प्रामाणिकपणे, खेळाडू वृत्तीने, आत्मविश्वासाने, आरोग्य साधक प्रयत्नशील राहून सवंगड्यांशी मैत्रीपूर्वक व उत्साहपूर्वक खेळ खेळण्याची शपथ सर्व खेळाडूंना दिली. यानंतर विविध स्पर्धात्मक खेळ सादर झाले. तीन दिवसीय वार्षिक क्रीडा संमेलनाच्या पहिल्या दिवशी स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना स्नेहा कोकणे पाटील व मनोज गुळेकर यांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके तसेच प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. यावेळी स्नेहा कोकणे पाटील यांना विद्यालयातील कलाशिक्षक उदय दुदवडकर यांनी साकारलेले स्नेहा कोकणे पाटील यांचेच ऍक्रेलिक कॅनव्हास पोर्ट्रेट पेंटिंग आदर्श एज्युकेशन सोसायटी व नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे यांच्यावतीने सदिच्छापूर्वक सन्मानभेट म्हणून संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमात आपल्या वक्तव्यात स्नेहा कोकणे पाटील यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षात्मक घटनांचा उल्लेख करून एक स्त्री म्हणून क्रीडा क्षेत्रात नाव कमवताना अनेकदा अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे सांगितले. जनतेच्या उपेक्षेला सामोरे जावे लागले मात्र त्याला सामोरे जाण्यानेच यशप्राप्ती व ध्येयप्राप्ती झाल्याचे सांगितले. मुलींनी क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होत असताना मुळीच संकोचित होऊ नये व त्यांच्या पालकांनीही त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करावे. जुडो-कराटे सारखे आत्मसंरक्षणात्मक तसेच इतरांचे संरक्षण करण्यार्थ उपयोगी असलेले मर्दानी खेळ आत्मसात करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. खेळ खेळताना खेळाडूंनी सर्व काही विसरून आपण खेळाडू आहोत याचे भान प्राधान्याने ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. मनोज गुळेकर यांनी विद्यालयातील विद्यार्थी क्रीडाक्षेत्रात उत्तम यश संपादित करीत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला-गुणांना अमर्यादित प्रोत्साहन मिळत राहील यासाठी आपण व आपली संस्था अखंड कार्यरत राहू असे सांगितले. नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थी हे भविष्यात मोठे लावलौकिक प्राप्त करू शकतील या दृष्टीने त्यांना येथे सर्वांगीण शिक्षण देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन विद्यालयाच्या सहशिक्षिका सोनाली पाटील यांनी केले.