*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरातला प्रारंभ*
*एनएसएस म्हणजे स्वयंशिस्त*
*श्री सुरेश सामंत*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या निवासी शिबिराला प्रारंभ झाला. दिनांक 23 ते 29/12/2022 दरम्यान फोंडाघाट गांगोवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन फोंडाघाटचे प्रसिद्ध उद्योजक श्री. सुरेश सामंत यांच्या हस्ते झाले. ‘एनएसएस म्हणजे स्वयंशिस्त. आजकालच्या तरुणाईला स्वयंशिस्तीचे धडे मिळणे आवश्यक आहे. अगदी सगळेच नसले तरी मोठ्या संख्येने बेजबाबदार तरुणांची फौज समाजात वावरताना दिसत आहे. आणि हा बेजबाबदार तरुणच समाजाला घातक आहे. एनएसएस सारख्या शिबिरातून जबाबदार तरुण घडतील अशी आशा आहे. 21 व्या शतकातील विद्यार्थी हुशार आहे, तंत्रज्ञानात तर फारच वेगवान आहे. त्या वेगाचा उपयोग एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी झाला पाहिजे. शिबिरातील अनुभव साठवून ठेवा आणि आपले व्यक्तिमत्व घडवा, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.
प्रमुख वक्ते श्री. विनायक सापळे म्हणाले की, राष्ट्राच्या विकासाचा ध्यास युवकांनी घेतला पाहिजे. त्यांनी आपल्या शिक्षकांचे संस्कार अंगीकारले पाहिजेत. आपली कला विकसित केली तर नेतृत्व गुण विकसित होतात. विद्यार्थ्यांनी आपली हुशारी आणि ज्ञान समाज विकासासाठी वापरले पाहिजे. तरच समाजात शांतता नांदेल.
संस्थेचे संचालक श्री. राजू सावंत पटेल म्हणाले की, आम्ही विद्यार्थी घडविण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याचा योग्य उपयोग विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे. समाजाची प्रगती युवकांच्या हातात आहे. आणि तोच युवक जर बेजबाबदार असेल तर समाजही बेजबाबदार घडेल आणि ते देशासाठी घातक आहे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षिय भाषणात संस्थेचे सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिग्रस म्हणाले की, संस्कारक्षम विद्यार्थी हीच आमची संपत्ती आहे. युवकांनी समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन करताना सहकार्याने वागले पाहिजे. प्रत्येक युवक हा धाडसी असला पाहिजे. त्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. आपल्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण असले पाहिजे. हे प्रशिक्षण व आत्मविश्वास देण्याचे काम संस्था व कॉलेज नेहमीच करत असते. आणि त्यात सर्वात मोठा वाटा एन.एस.एस. चा असतो, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले तर आभार प्रा. संतोष आखाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले, उद्योजक श्री. सुभाष उर्फ आबा मर्ये, नूतन ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड तसेच महाविद्यालयाचा सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.