*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.*
*ध्येय निश्चित असले की इतिहास घडतो.*
*ब्रिगेडियर सुधीर सावंत*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत यांनी मार्गदर्शनात सांगितले की, युवकांनी प्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय निश्चित असले तरच इतिहास घडतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि ताराराणी यांचे ध्येय निश्चित होते, त्यामुळे त्यांच्या कार्याची इतिहासाने नोंद घेतली. त्यांच्या स्वराज्य स्थापनेचा इतिहास तर जगाने आदर्श म्हणून स्वीकारला. आज जगातील अनेक देश छत्रपती शिवाजी महाराजांचे अभ्यासक आहेत. हीच भारताची खरी ताकद आहे. विविधतेने नटलेला आणि विखुरलेला हा प्रदेश एकसंघ बांधण्याचे काम महाराजांनी केले होते. महाराणी ताराराणीचेही कार्य तसेच अनोखे होते. चुकीच्या इतिहास लेखकामुळे त्यांचे कार्य समाजात पोहोचले नाही. तरीही त्यांची नोंद घेणे गरजेचे आहे. असेही प्रतिपादन त्यांनी केले.
त्यानंतर सन्मा. अतिथी बाळासाहेब डोर्ले म्हणाले की, कष्टाची चीज काय असते हे संस्थेचा विकास पाहिला की समजते. आमच्या काळात फार कष्टाने ही संस्था उभी केली. त्यानंतर कालमानाने व वयोमानाप्रमाणे ही संस्था तरुणांच्या हातात दिली आणि त्यांनी आम्ही लावलेल्या या ज्ञानरूपी रोपाचे वटवृक्षात रूपांतर केले. त्यामुळे आम्ही उपसलेल्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटते. बापाच्या पाठीमागे कर्तुत्वान मुलं निघाली की जीवनाचे सार्थक होते, याचाच अनुभव मी घेत आहे.
त्यानंतर सन्मा. डॉ. अजित सावंत पटेल म्हणाले की, आम्ही माजी विद्यार्थी मदतीचा ओघ देत असतो. आणि या मदतीचा योग्य वापर ही संस्था करते, यातच आमचे समाधान आहे. आजपर्यंत मी पाहिलेल्या फोंडाघाटच्या विकासात या शैक्षणिक संकुलाचा फार मोठा वाटा आहे. खरं म्हणजे शिक्षित वर्गच समाज बदलू शकतो, हे वास्तव आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश कामत यांनी केले. त्यात महाविद्यालयाच्या चढत्या प्रगतीचा आढावा घेतला. डोंगराळ भागात शैक्षणिक संस्कार विकसित करण्याचे आवाहन संस्थेने कसे पेलले हे त्यांनी स्पष्ट केले.
चालू शैक्षणिक वर्षाचा शैक्षणिक, कला, क्रीडा गुणांनी फुललेला सविस्तर वार्षिक अहवाल प्राचार्या डॉ विष्णू फुलझेले यांनी मांडला. ग्रामीण भागात नोकरी करणे एक आव्हान असून त्यातही खूप मोठे समाधान आहे. फोंडाघाट मध्ये काम करताना ते समाधान मिळते हे निश्चित, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत व सन्मा. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते क्रीडा, सांस्कृतिक, एन एस एस, एन सी सी विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल २०२२ मधील परीक्षेत महाविद्यालयात सर्वोच्च गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुभाष सावंत म्हणाले की, चेअरमन म्हणून काम करताना आपल्या संस्थेच्या विविध शाखांचे कौतुक केले पाहिजे. आपल्या ध्येयासाठी झोकून देऊन काम करणारी अनेक माणसं या संस्थेला मिळाली. म्हणून ही संस्था नावारूपाला आली. आम्ही पाठिंबा देणारे असलो तरी, प्रत्यक्ष मन लावून काम करणारे कर्मचारी या विकासाचे खरे हक्कदार आहेत, असे त्यांनी सांगितले. या समारंभासाठी संस्थेचे सेक्रेटरी मा श्री चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार मा श्री आनंद मर्ये, संचालक मा श्री मा श्री महेश सावंत पटेल, मा श्री संदेश सावंत पटेल, न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री शंकर सावंत, लिट्ल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ विनया लिंग्रस, श्रीमती दळवी मॅडम, श्री राजन नानचे, श्री बाळा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले.
सायंकाळी विविध सांस्कृतिक कलागुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेते मा श्री अभय खडपकर त्यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की, माणूस हा कलाकार असला पाहिजे तरच तो जीवनाचा आनंद घेऊ शकतो. या देशात अनेक कलाकार मंडळी आहेत, त्यांनी आपल्या कलांनी या देशाचा इतिहास घडवला आहे. कर्तुत्वाने मोठी माणसे फार नम्र असतात, असा अनुभव अनेक चित्रपटात काम करत असताना आला. तोच नम्रपणा आपल्याकडे असला पाहिजे, तरच जीवन समृद्ध होईल. असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले.