*कोकण Express*
*धूम स्टाईल गाड्या चालवणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना आवर घाला…*
*शहरात नाकाबंदी करून कारवाई करा ; मनसेची मागणी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
धूम स्टाईल गाड्या हाकणाऱ्या शहरासह परिसरातील महाविद्यालयीन युवकांना आवरा, आवश्यक असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी आज येथील मनसेच्या वतीने सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे. बेदकार वाहने चालवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. तशा तक्रारी काही नागरिकांनी आमच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान येत्या एक-दोन दिवसात नाकाबंदी करून अशा बाईक स्वारांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसीफ सय्यद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, प्रवीण गवस, सचिव कौस्तुभ नाईक, दर्शन सावंत, सोनू सावंत, रवींद्र दळवी आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरासह लगतच्या परिसरात असलेल्या महाविद्यालयीन युवक धूम स्टाईल गाड्या चालवत आहेत. त्यामुळे अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. अशा युवकांसह अनेकांना अपघात घडले आहेत. काही वेळा पादचाऱ्यांना सुद्धा अपघात होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबतच्या तक्रारी वारंवार मनसेकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रमुखांना आम्ही सूचना दिल्या. मात्र महाविद्यालय सुटल्यानंतर आमची जबाबदारी संपते, असे सांगून काहींनी हात वर केले आहेत. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनानेच गांभीर्याने पहावे. अशा धूम स्टाईल बाईक स्वारांना त्यांनी आवर घालावा. वेळ पडल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवत येत्या दोन-तीन दिवसापासूनच महाविद्यालयीन धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली जाईल. त्यासाठी शहरात नाकाबंदी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.