*कोकण Express*
*दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर सोनुर्ली च्या श्रीदेवी माऊली जत्रोत्सवास उत्साहात प्रारंभ…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही भाविक सोनुर्ली नगरीत दाखल झाले होते. दिवसभरात हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी नतमस्तक झाले.

तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला बुधवारी सकाळी उत्साहात सुरवात झाली. उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर सात वाजल्यापासून दावीचे दर्शन भक्तासाठी खुले करण्यात आले. यावेळ आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीची दर्शन देण्यात आले,

यावेळी ओटी व केळी ठेवण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केलेले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. सकाळपासूनच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तर दुपारनंतर ती अधिकच वाढत गेली. त्यानंतर सायंकाळी व रात्रौ जत्रोत्सवात भाविकांचा जनसागरच उसळला.
लोटांगणापूर्वी संपूर्ण दिवस माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरु होता. सकाळ पासूनच मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवक नेमून त्याठिकाणी योग्य ती खबरदारी ठेवण्यात आली होती. गतवर्षी एसटी बंद, पावसाचे विघ्न व काहीसे कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी पेक्षा गर्दी काहीशी कमी होती मात्र यावर्षी भाविकांचा उत्साह मोठा होता. सावंतवाडी एसटी डेपोतून जादा बसेस सोडण्यात आल्याने कचाकच गाड्या भरुन भाविक सोनुर्लीत दाखल होत होते.
जत्रौत्सवानिमित्त माऊलीच्या प्रांगणात हॉटेल, दुकाने व इतर स्टॉलही मोठया प्रमाणात उभारलेले होते. दोन दिवस याबाबत व्यावसायिकांची लगबग दिसून आली होती. केळी, फुले यांचे स्टॉलही मोठया प्रमाणात लागले होते. कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकानेही सजली होती. विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परप्रांतीय व्यापाऱ्यांची भरणा जत्रोत्सवात दिसून आला. थंडीचे दिवस असूनही आईसक्रीम ज्वेलरी दुकानांची संख्याही मोठया प्रमाणात होती. खेळण्यांची दुकाने व गृहोपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटली होती. गतवर्षीच्या पावसाचा अनुभव लक्षात घेता दुकानदारांनी आपल्या दुकानांना प्लास्टिक व पत्रे घालून संरक्षित केले होते. जत्रौत्सवाला येणाऱ्या भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.