*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री नारायण राणेंच यांची थट्टा पडली भास्कर जाधव यांना महागात*
*वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्टेशनला दाखल केली तक्रार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल व्हावा अशी तक्रार कुडाळ पोलीस स्थानकात भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे. अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहेत, तरीही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन भाजपा नेत्यांनी व पदाधिकाऱ्यानी केले आहे. तरीही परिस्थितीचे गांभीर्य आणि संवेदनशीलता समजून घेऊन तातडीने या प्रकरणाची दखल घ्यावी असे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, या मोर्चात पेटती मशाल आणि ज्वलनशील पदार्थ घेऊन शासकीय कार्यालयावर चाल करून जाण्याचा ठाकरे सेनेचा प्रकार हा देखील अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
सदरच्या तक्रारीत म्हंटले आहे की, आज कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्यावरील एसीबी कारवाईच्या विरोधात एसीबी कार्यालयावर ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. सदर मोर्चाच्या वेळी भाजपा नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्ये शिवसेना नेते करणार याची पूर्वकल्पना आल्याने आपणास कालच आम्ही त्यासंबंधी सूचना लेखी तक्रार अर्जाद्वारे दिलेली होती. तरीही आजच्या मोर्चात भाषणे करताना भाजपा नेत्यांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह शिवराळ गलिच्छ भाषा वापरण्यात आलेली आहे. सदरची माहिती पोलिसांना आपल्या यंत्रणेद्वारे, तसेच मीडियावरून मिळाली असेलच. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भास्कर जाधव यांनी व्यासपीठावरून जाहीरपणे शिवीगाळ करत बदनामी करणारी आणि खालच्या दर्जाची अत्यंत आक्षेपार्ह अशी शिवराळ भाषा वापरली आहे. या घृणास्पद प्रकाराने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय संतापाची लाट निर्माण झाली असून आपण योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधितांवर पोलिसांकडून होईलच असा विश्वास देत त्यांना संयम राखण्याचे आवाहन पक्षनेत्यांनी केले आहे. तरी, या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणून त्वरित आमदार भास्कर जाधव यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दलच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून सदर प्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून आजचे वक्तव्य आणि नारायण राणेंशी घेतलेला पंगा भास्कर जाधव यांना चांगलाच भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.