*कोकण Express*
*माणूस जातीने नव्हे गुणाने मोठा*
*कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन*
*कासार्डे; संजय भोसले*
कोणताही माणूस हा जातीने मोठा होत नसून आपल्या गुणाने मोठा होतो असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या 42 व्या अधिवेशनाप्रसंगी केले.वेस्ट हायकोर्ट रोडवरील जवाहर विद्यार्थी गृह येथे आयोजित या एक दिवसीय अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेचा मंत्र दिला. बाबासाहेब हे एका जातीचे नेते नसून संपूर्ण समाजाचे नेते होते.अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग यांनी कृष्णवर्णीय लोकांसाठी लढा दिला तसाच लढा बाबासाहेब आंबेडकरांनी येथील दलित शोषित आणि वंचित समाज समाजासाठी दिला.भगवान बुद्ध यांच्या शरणी जाऊन सामाजिक समतेवर आधारित असा बौद्ध धर्म नागपूर येथे स्वीकारत त्यांनी नवीन इतिहास घडवला. बाबासाहेबांचे सामाजिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक विचार तसेच महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांचे विचार तत्कालीन परिस्थितीला अनुरूप असेच होते, या तिघांनी केलेल्या कार्यामुळेच सामाजिक सुधारणा आणि सामाजिक विकास यात भर पडली यांच्या कार्यामुळेच देशाच्या 75 वर्षाच्या काळात शिक्षण हे तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचले. आजच्या काळात शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना उद्यमशीलतेचे कौशल्य शिकविले गेले पाहिजे. सामाजिक चळवळ आता आर्थिक चळवळ कशी होईल याचा विचार आता वंचित वर्गातील विद्यार्थी आणि सुधारकाने केला पाहिजे.
जगाला बुद्धाची खरी ओळख व्हावी याकरिता 25 हजार कोटीचे बुद्ध सर्किट योजना सुरू झाली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव नामदेवराव कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी केले.यावेळी राज्यातील अनेक आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.शिक्षक बँक निवडणुकीत निवडून आलेल्या शिक्षकांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.