*कोकण Express*
*सांस्कृतिक केंद्रासाठी अडीच तर विविध प्रकल्पांसाठी अडीच कोटींचा निधी उपलब्ध ; ना. उदय सामंत*
या सांस्कृतिक राजधानीतील २००५पासून बंद असणाऱ्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी राज्य सरकारने अडीच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून २६ जानेवारीला नाट्यगृहाला पडदा उघडेल. या प्रकरणी झालेल्या विविध तक्रारींची परजिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून ९० दिवसाच्या आत सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कदाचित मी पालकमंत्री झाल्यावर तिसरी घंटा वाजावी हे नियतीच्या मनातच असावे असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केले.
त्यांच्या या घोषणेने चिपळूणकर नाट्य रसिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत गुरुवारी रात्री चिपळूणमध्ये आले. त्यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या कामाची, अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुलाची पाहणी केली. नगरपरिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत पाच कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी अडीच कोटी रुपये, छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी दीड कोटी रुपये, खेडेकर क्रिडा संकुलाच्या सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय चिपळूण पूरमुक्त होण्यासाठी पावसाळ्यानंतर गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात येईल. एन्रॉनचा खचलेला पूल दुचाकीस्वारांसाठी लवकरच खुला करण्यात येईल तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे ना. सामंत यांनी सांगितले.
यावेळी माजी आ. रमेश कदम, माजी आ. सदानंद चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम, माजी नगरसेवक आशिष खातू, विजय चितळे, भरत गांगण, भाजप सरचिटणीस रामदास राणे, माजी जि.प.सदस्य दिलीप माटे, उमेश काटकर, गजाना महाडिक, निहार कोवळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, नगर अभियंता परेश पवार, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अधिक्षक अनंत मोरे, अशोक पवार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.