*कोकण Express*
*ध्येयावर जो एकाग्र राहतो तोच यशस्वी होतो – डॉ. राजश्री साळुंखे*
*कणकवली महाविद्यालयात खेळाडूंचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशेष गुण दडलेला असतो त्या गुणांची ओळख करून घेणे आणि त्या गुणांचा विकास करणे हे आपल्या हातात असते. उत्तम पद्धतीचे वेळेचे नियोजन आणि खेळाडू वृत्ती आणि कठोर मेहनत या गुणावरच आपण यशस्वी होत असतो. आपल्या जीवनात एका ध्येयावर जो एकाग्र राहतो तोच यशस्वी होतो असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे यांनी केले.
कणकवली महाविद्यालयात जिमखाना विभागाच्या वतीने गुणवंत खेळाडूंच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सत्यवान राणे, सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे, एनसीसी विभागप्रमुख डॉ. बी. एल. राठोड उपस्थित होते.
यावर्षी मुंबई मुंबई विद्यापीठाच्या वतीने झालेल्या क्रीडा स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवलेले आहे. पिस्टल रायफल शूटिंग या कलाप्रकारात अवधूत मेस्त्री, स्वप्निल कालेकर, प्रतीक मोरे आणि साहिल पडवळ या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले आहे. तर ज्युदो या स्पर्धेत महेश शेख या विद्यार्थिनी रजतपदक मिळाले आहे. याबरोबरच कोकण विभागीय आंतर महाविद्यालय स्पर्धेत कुस्ती (मुले) शुभम सावंत , मेहक शेख (मुली) यांनी कांस्यपदक मिळवले तर बॅडमिंटन स्पर्धेत अथर्व पोरे यांची विद्यापीठ संघात निवड झाली आहे. या शिवाय तायकांदो या क्रीडा प्रकारातून स्नेहा पाटील या विद्यार्थीनीस रजत पदक प्राप्त झाले. या सर्व गुणवंत खेळाडूं, गुणवंत एनसीसी छात्र तसेच संघ व्यवस्थापक प्रा.सत्यवान राणे, डॉ. बी. एल. राठोड, प्रा.एम. जे.कांबळे,प्रा. प्रविण कडूकर, प्रा. अदिती मालपेकर यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी महाविद्यालयातील क्रीडा विभागाचा वैभवशाली इतिहास स्पष्ट केला. या वेळी प्राचार्य डॉ.चौगुले म्हणाले की,’चांगली शारीरिक प्रकृती आणि मानसिक तंदुरुस्ती हेच आपल्या सुदृढ जीवनाचे गमक असून शारीरिक क्षमता आणि मनोबल हे मैदानी आणि मर्दानी खेळातून वाढत असते. आज केवळ छंद म्हणून नव्हे तर करिअर साठी आपण वेगवेगळ्या खेळांचा विचार करू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एल. राठोड यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सत्यवान राणे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन प्रा. युवराज महालिंगे यांनी केले