*कोकण Express*
*जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणूक निकाल जाहीर*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आठ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था सभागृहात पार पडली. यावेळी सूरज देसाई, संतोष परब, श्रीकृष्ण मुळीक, न्हानु दळवी, अमित तेंडोलकर, गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर, विठ्ठल मालंडकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. यातील ९ जागा बिनविरोध झाल्याने शिल्लक आठ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. प्रत्येक तालुक्यासाठी एक व जिल्हा मुख्यालय अशा केंद्रांचा यामध्ये समावेश होता. यासाठी ८६० मतदार निश्चित झाले होते. यातील ६२४ मतदारांनी मतदान केल्याने ७२.५५ टक्के मतदान झाले होते.