*कोकण Express*
*विविध मागण्यांसाठी जिल्हा मध्यामिक अध्यापक संघाचे आंदोलन*
*सिंधुदुर्गनगरी*
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. या प्रलंबित मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आज दुपारी दोन ते पाच या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. व आपल्या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
कोरोना काळातील दिवंगत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना नियमानुसार सानुग्रह अनुदान तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा योजनेनुसार सेवेची संधी देण्यात यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी वय वर्षे ५५ पेक्षा अधिक असलेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे प्रशिक्षण अटीतून वगळण्यात यावे. तसेच प्रशिक्षण न झाल्याच्या कारणाने पेन्शन प्रस्ताव नाकारण्यात येऊ नये, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळातील अर्धवेळ सेवेतील शिक्षक शिक्षकेतर यांची अर्धवेळ सेवा पेन्शन साठी ग्राह्य धरण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत तसेच एकाच प्रकारची माहिती ऑनलाईन मागविण्यात येऊ नये, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी तसेच या पदासाठी पाचवी ते दहावी बारावीची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात यावी, प्रत्येक शाळेत कला व क्रीडा शिक्षकांची विशेष शिक्षक पदे भरण्यात यावी व सदर पदे संच मान्यतेत स्वतंत्र दर्शविण्यात यावी, शून्य ते वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे तेव्हा २१ सप्टेंबर २०२२ चा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, कोरोना काळातील घातलेले निर्बंध उठउन गरजेनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरतीस परवानगी देण्यात यावी. यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
आज जिल्हा परिषदेसमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अद्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, कार्यवाह विजय मयेकर, विश्वनाथ सावंत ,संजय परब, सुधीन पेडणेकर, जयदीप सुतार, भाऊसाहेब चौरे, सतीश शिंदे, शिवराम सावंत, आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.