*कोकण Express*
*कट्ट्यातील श्री पद्धतीची भात शेती ठरते आकर्षणाचा विषय*
*कट्टा ःःप्रतिनिधी*
शेतकऱ्यांनी सुधारित जातीची जास्तीत जास्त लागवड करावी लागवडीच्या सुधारित पद्धती उदाहरणार्थ श्री पद्धत चार सूत्री पद्धत अशा पद्धतीचा वापर करावा तसेच खताचे पाण्याचे ,तणांचे व रोग किडीचे योग्य नियोजन करावे असे भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे कृषी विद्या वित्त डॉक्टर विजय शेटे यांनी कट्टा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. कोकणामध्ये पावसाळ्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करीत आहेत यामध्ये आता यांत्रिकीकरण व आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. वाढती मजुरी मजुरांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांनी श्री भात लागवड पद्धतीचा अवलंब केला आहे. यामध्ये बियाणे प्रति हेक्टरी कमी लागते शिवाय उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होते असे दिसून आले आहे. कट्टा येथील शेतकरी सौ स्वाती सुधीर वराडकर यांनी अशाच प्रकारे आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. पारंपारिक शेती सोडून सौ वराडकर यांनी गेली तीन वर्षे श्री पद्धतीने भात लागवडीत भरघोस उत्पादन घेतले आहे. यावर्षी त्यांनी अधिक क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने मे महिन्यापासूनच बियाणे निवडीपासून रोपवाटिका तयार करण्यापर्यंत योग्य नियोजन केले होते यासाठी त्यांनी आरळी 6444 बासमती ब्लॅक राईस वाडा कोलम अशा स्थानिक व संकरित बियाण्यांची निवड करून चटई मॅटवर भाताची रोपे तयार केली. रोपे बारा ते पंधरा दिवसाची झाल्यावर जमीन तयार करून त्याची 25 बाय 25 सेंटीमीटर लागवड अंतराने भात रोपांची लावणी केली तसेच पंधरा दिवसांनी त्यामध्ये कोळप्याच्या सहाय्याने कोळपणी केली आहे. आज कट्टा पंचक्रोशीत बरेच शेतकरी ही लागवड बघून श्री पद्धतीने लागवड करण्यासाठी पुढे येत आहेत. एका ठिकाणी एकच रोप लावलेल्या रोपाला भरपूर फुटवे आलेले आहेत. सदर लागवडीसाठी मालवण तालुका कृषी अधिकारी श्री व्ही जी गोसावी, कृषी पर्यवेक्षक डी डी गावडे, श्री एस जी परब, कृषीसेवक पवन कुमार सोंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर श्री पद्धती ने लावलेला भात पिकाचा प्लॉट हा कट्टा हायस्कूलच्या नजीक असल्याने विद्यार्थ्यांचे पालक, तसेच शेतकरी वर्ग, ग्रामस्थ श्री पद्धतीची भात शेती पाहण्यासाठी येत आहेत.