*कोकण Express*
*शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिवाळी सुट्टीनंतर घ्याव्यात…*
*शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्याकडे मागणी*
*कासार्डे – संजय भोसले*
शालेय क्रीडा स्पर्धा सुरू करणे बाबत शासन स्तरावरून उशीर झाला आहे. विद्यार्थी व खेळाडू हित लक्षात घेऊन शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दिपावली सुट्टीनंतरच घेण्यात याव्यात अशी लेखी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण आणि महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा १२ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होत आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना/खेळाडूंना स्पर्धेसाठी पाठविण्यास बहुतेक पालक तयार नसतात तसेच बहुतांश शाळाही खेळाडूंना पाठवण्यास अनुत्सुक असतात.यामध्ये क्रीडा शिक्षकांची मात्र मोठी कोंडी होते.
शिवाय या वर्षी राष्ट्रीय शालेय स्पर्धा आयोजना बाबत संदिग्धता आहे. स्पर्धा होतील की, नाही किंवा झाल्याच तर डिसेंबर नंतर अथवा जानेवारीत होतील असे वाटते जिल्हा कार्यक्रम दिपावली सुट्टी नंतर आयोजित करावा.
त्यामुळे खेळाडूचे होणारे शैक्षणिक नुकसान टळेल असे वाटते. खेळाडूंची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कृपया शालेय स्पर्धांची सुरुवात दिवाळीच्या सुट्टीनंतर व्हावी.
सर्व बाबी लक्षात घेऊन ही मागणी क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक,आणि पालकांमधून होत आहे.
शालेय स्पर्धा घेण्याबाबत जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांची नेहमीच सहकार्याची भूमिका असते आणि राहणार आहे.
मात्र कोरोना काळानंतर होणा-या यावर्षीच्या शालेय स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग मिळावा म्हणून ही स्पर्धा दिवाळीनंतरच व्हावी ही अपेक्षा आहे असेही जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण आणि महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद करून योग्य ती कार्यवाही व्हावी अशी विनंती त्यांनी केली आहे.
*खेळाडूंचे नुकसान टाळले जावे*
सहामाही परीक्षा काही दिवसातच सुरू होत असल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात गणपतीच्या सुट्टीनंतर थोडाच कालावधी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मिळला असल्याने खेळाडू विद्यार्थ्याचे नुकसान होऊ शकते कारण, तो विद्यार्थी खेळामध्ये सहभागी न होता तो परीक्षेवरती लक्ष केंद्रित करणार व तो शालेय स्पर्धेला मुकणार त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा दिवाळीनंतरच घेण्यात याव्यात.