*कोकण Express*
*गांधीविचार संपविण्याचे प्रयोग यशस्वी होणार नाहीत: समीक्षक प्रा. डॉ. नीतीन रिंढे*
*कवी अजय कांडर यांच्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ काव्यसंग्रहाचे पुणे येथे प्रकाशन*
*रंगकर्मी अतुल पेठे यांनी केली कवी कांडर यांच्या प्रयोगशील काव्य वाटचालीची मांडणी*
*कार्यक्रमाला सर्व स्तरातील मान्यवरांची बहुसंख्येने उपस्थिती*
*कणकवली/प्रतिनिधी*
गांधी विचार संपविण्याचे कारस्थान आज जोमात सुरू आहे. गांधी विचार स्वीकारल्यासारखे भासवून ते संपविण्याचा सध्या प्रयोग चालू असून, याकरिता वेगवेगळी प्रतीके वापरली जात आहेत. मात्र गांधीविचार कदापि संपविता येणार नाहीत.आजचा नेमका काळ समजून घेऊन लेखन करणाऱ्या कवी अजय कांडर यांनी “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ कवितेत याचीच धाडसाने मांडणी केली आहे.असे प्रतिपादन नामवंत समीक्षक व मराठी भाषा संशोधन मंडळाचे नवनियुक्त संचालक प्रा. डॉ. नीतीन रिंढे यांनी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या “अजूनही जिवंत आहे गांधी” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले.
कवी अजय कांडर लिखित ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या हर्मिस प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या दीर्घ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पुणे राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात प्रा.रिंढे आणि ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्र सेवा दल आणि हर्मिस प्रकाशनने आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्याला प्रकाशक सुशील धसकटे, कार्यक्रमाचे संयोजक विख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील बहुसंख्येने मान्यवर रसिक उपस्थित होते.
प्रा.रिंढे म्हणाले, आजचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण वेगळे आहे. त्यावरची ही कविता आहे. कवी अजय कांडर यांनी आपल्या कवितेतून गांधीविचाराची गरजच बोलून दाखविली असून, ही कविता वाचकाला निश्चितपणे नवी दृष्टी देऊ शकेल. वास्तविक गांधी विचारांचा विपर्यास हा त्यांच्या हयातीतच सुरू झाला होता. आज गांधी विचार संपविण्याचे कारस्थान अतिशय जोमाने सुरू असल्याचे दिसते. विचारांवर हल्ला करून ते थेटपणे संपविणे आणि विचार स्वीकारून तो संपविणे, असे दोन प्रकार आहेत. त्यातला दुसरा प्रकार आज वापरला जात आहे. गांधीविचार स्वीकारल्यासारखे भासविले जात आहे. गांधींच्या वेगवेगळय़ा प्रतीकांचा वापर त्याकरिता करण्यात येत आहे. आपल्या सिस्टिममध्ये गांधी बसविले जात आहेत. परंतु, हे करताना त्यांचा म्हणून जो मूलभूत विचार आहे, तो स्वीकारला जात आहे का? हा मोठा प्रश्न आहे. अर्थात विचार कधीच संपत नाहीत. गांधीविचारांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे हा विचार संपविण्याचा डाव कधीच यशस्वी होणार नाही. हे कटकारस्थान ही कविता उघडे पडत असून अजय कांडर हे आजचा नेमका काळ समजून घेऊन लेखन करत आहेत.
अतुल पेठे म्हणाले, आजचा कालखंड हा विपरित आहे. अशा काळात कवी, वाचक, नाटककार, लेखक असतील, तर घाबरायचे काही कारण नाही. कलावंत निर्भिडपणे व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच तसेच ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या चारही कवितासंग्रहातील सामाजिकतेचा धागा उलगडून दाखवित गांधीविचारांचे आजच्या काळातील महत्त्वही पेठे यांनी अधारेखित केले. आणि “अजूनही जिवंत आहे गांधी” यासारखी कविता धाडसाने लिहिल्याबद्दल कांडर यांचे कौतुकही केले.
अजय कांडर म्हणाले, आज गांधीविचारांची, त्यांच्या शांततेची, अहिंसेची सर्वाधिक गरज आहे. 2014 पासून देशातील स्थिती बदलते आहे. माणूसपण संपविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा काळात संवादाच्या जागा वाढविल्या पाहिजेत गांधीविचारातूनच हे शक्य होऊ शकते.
प्रास्ताविक सुशील धसकटे यांनी केले, तर संदेश भंडारे यांनी आभार मानले.