स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांच्यामार्फत दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांच्यामार्फत दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

*कोकण Express*

*स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांच्यामार्फत दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न*

स्वंयदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत नुकतेच कणकवली या ठिकाणी दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गोकुळ दूध प्रकल्पाचे सन्माननीय रमेश ढोकरे साहेब व सन्माननीय राजेश गावकर साहेब यांनी केले. त्या वेळी स्वयंसिद्धा कोल्हापूर च्या प्रिया भुयेकर, राजश्री सावंत,स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव संतोष सावंत, अश्विनी तावडे, माधुरी सावंत, सिद्धी सावंत, अॅड. मनीषा सावंत व तनिष्का सावंत उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत म्हणाले की अशा प्रकारचे दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण आयोजित करण्यामागे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट रोजगार निर्मिती असे आहे . आपल्या दैनंदिन जीवनात दुधाचा वापर होतच असतो, त्यामुळे महिलांना रोजगाराची एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते . तसेच आपण घरच्या घरी दुधाचे पदार्थ बनवून आपल्या कुटुंबाला स्वच्छ, निर्जंतूक आणि ताजे पदार्थ खायला घालू शकतो . ते पुढे म्हणाले की अशाप्रकारे घरगुती उद्योग करू पाहणाऱ्या महिलांच्या पाठीशी स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट उभी राहील .

गोकुळ दूध चे सन्माननीय श्री ढोकरे साहेब आपल्या भाषणात म्हणाले की आज दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत खूप मागणी आहे आणि त्यामुळे महिलांनी त्याचा सखोल अभ्यास करून व योग्य ते प्रशिक्षण घेऊन या उद्योगात उतरावे आणि प्रशिक्षण देऊन संस्थेने ही एक रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. तसेच स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टने अशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले अशासारख्या संस्था पाठीशी असतील तर महिलांनी या संधीचा फायदा करून घ्यावा असे आव्हान त्यांनी महिलांना केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

गोकुळ दूध चे सन्माननीय श्री राजेश गावकर हे आपल्या भाषणात म्हणाले की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. गावागावांमध्ये जास्त प्रमाणात दुग्ध उत्पादन होताना दिसते आणि त्याला जोड म्हणून स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टने अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी योग्य ते प्रशिक्षण घेऊन दुग्ध प्रक्रिया व्यवसायात उतरून या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. तरच भविष्यात दुग्ध उत्पादनाला सोन्याचे दिवस येतील आणि या क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती होईल . तसेच गावोगावची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. ते पुढे म्हणाले , की आपण सर्वोत्तरी त्यासाठी सहकार्य करायला तयार आहोत.

या प्रशिक्षणामध्ये कोल्हापूर येथील स्वयंसिद्धाच्या प्रशिक्षिका प्रिया भुयेकर मॅडम आणि राजश्री सावंत मॅडम यांनी महिलांना पदार्थ करताना, तसेच विक्री करताना कोणकोणती काळजी घ्यावी, स्वच्छता कशी राखावी, मार्केटिंग करण्यासाठी आपले बोलणे कसे असावे, व्यवसाय करताना छोट्या प्रमाणात सुरू करून नंतर हळूहळू वाढवत जावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी एकमेकांना सहाय्य करणे गरजेचे आहे असे सांगितले.

त्यांनी महिलांना अगदी सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेत प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात त्यांनी महिलांना दूध बर्फी, पेढे, गुलाबजामुन, रसमलाई, लस्सी, पनीर, मोझरेला चीज या सारख्या पदार्थांचे प्रशिक्षण दिले . प्रशिक्षणाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला .

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत यांनी अनेक वर्ष त्यांच्या संस्थेची जोडलेल्या महिला नयना राणे आणि पूजा राऊत ज्यांनी प्रशिक्षणामधून प्रेरणा घेऊन छोटे घरगुती खाद्यपदार्थाचे व्यवसाय सुरू केले त्यांचा गौरव केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सौ . सुजाता महाडेश्वर या प्रशिक्षणांत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, संस्थेने एक चांगला उपक्रम राबवून महिलांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आणि त्याबद्दल त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनिष्का सावंत हिने केले आणि आभार प्रदर्शन मनीषा सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!