फोंडाघाट महाविद्यालयाचा वर्धापन दिन संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयाचा वर्धापन दिन संपन्न

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयाचा वर्धापन दिन संपन्न*

*फोंडघाट ःःप्रतिनिधी* 

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. १२ सप्टेंबर१९९५ साली सुरू झालेल्या या महाविद्यालयाने मागील २७ वर्षात अनेक यशाची शिखरे पार केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी चेअरमन श्री. प्रदीप तथा आबू पटेल उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मनोगतात खुशी कामतेकर व आयुष सावंत यांनी आपली मनोगते मांडली. त्याचबरोबर महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री. दीपक सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकामध्ये प्रतिपादन करताना डॉ. सतीश कामत म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या या शैक्षणिक संकुलामुळे उच्च शिक्षणाची सोय झाली व खऱ्या अर्थाने फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागाचा विकास झाला. शिक्षणाच्या चौकटीच्या बाहेर फेकला गेलेला तरुण वर्ग उच्चशिक्षित झाला. यामुळेच महाविद्यालयाने अनेक मान्यता प्राप्त पुरस्कार प्राप्त केले आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फुलझेले म्हणाले की ग्रामीण डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली यासारखे परम कार्य कोणते नाही. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यातून शिक्षण संस्था फुलवून शिक्षणाची बाग निर्माण केली हे कार्य अतुलनीय आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. प्रदीप तथा आबू पटेल म्हणाले की कोणत्याही संस्थेची विद्याशाखेत वाढ ही त्या संस्थेची प्रगती दाखवते. १९५२ साली स्थापन झालेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय हे पाचवे अपत्य आहे. सुरुवातीच्या विनाअनुदान काळाचा मी साक्षीदार आहे. संस्थेबरोबरच कर्मचाऱ्यांच्याही कसोटीचा तो काळ होता. त्यातून पार होत महाविद्यालयाने अनेक उत्तुंग शिखरे पार पाडली. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च विभूषित होताना पाहिले की मनाला फार समाधान वाटते. राजकारण करत असताना शिक्षण क्षेत्रात मात्र प्रामाणिकपणे समाजकारण केले आणि त्याच प्रामाणिकपणाचे फळ आज याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मला लाभले. आपण लावलेल्या रोपट्याची रसाळ फळे लागलेली पाहताना मिळणे यासारखे भाग्य नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे नीट लक्ष दिले पाहिजे. स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करा. आणि आपला उत्कर्ष साधा आणि त्याचबरोबर ज्ञानदान करणाऱ्या संस्थेला विसरू नका. असे प्रतिपादन केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन श्री.सुभाष सावंत म्हणाले की आत्ताचा महाविद्यालयाचा ऐश्वर्याचा काळ आहे परंतु त्याचा पाया रचणाऱ्यांचे आभार मानतो कारण त्यांनी या वटवृक्षाचे पालन पोषण केले आहे. त्यामुळे मी आज येथे उभा आहे. विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकोप्याने महाविद्यालयाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाच्या केलेल्या सोयीचा उपयोग करून घ्या आणि जीवन यशस्वी करा.असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रायबोले यांनी तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!