*कोकण Express*
*लोक राजा सुधीर कलिंगण यांना भाव सुमनांजली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
श्री दत्तक्षेत्र मठ आशिये आणि झिरो बजेट प्रोडक्शन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण यांना काव्यपटाद्वारे भाव सुमनांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. दत्त मंदिर आशिया या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. याप्रसंगी गावराहाटी आणि मराठी साहित्य तसेच व्यासंगी अभ्यासक जी ए सावंत सर ,दशावतारी ज्येष्ठ कलाकार भास्कर सामंत, माजी पं.स. उपसभापती महेश गुरव, सुधीर कलिंगण यांचे ज्येष्ठ बंधू लक्ष्मण कलिंगण, सुधीर कलिंगण यांचे चिरंजीव सिद्धेश कलिंगण, दशावतारी कलाकार प्रशांत मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या अभूतपूर्व अभिनय संपन्न शैलीने रसिक ह्रदयावर अधिराज्य गाजविणारे सुधीर कलिंगण देहाने आपल्यातून निघून गेले असले तरी, या झगमगत्या सिता-यांच्या दुनियेत आपलं आढळ स्थान निर्माण करणाऱ्या ताऱ्याकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे, त्यासाठी वारंवार जाणीवपूर्वक अशा कार्यक्रमाचे आयोजन केलं पाहिजे याचं भान ठेवून लोकराजा सुधीर कलिंगण समस्त रसिक जणांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि या ताईत मधील कंठमणी प्रत्येकाच्या हृदयाजवळ आहे म्हणून त्यांना आदराची भाव सुमनांजली देताना कंठमणी या काव्याचे काव्यपटात रूपांतर करून भावसुमनांजली देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे निमंत्रण विलास खानोलकर यांनी सांगितले. अफाट कर्तृत्व असणारे लोक राजा कंठमणी सुधीर कलिंगण यांच्या मध्यबिंदू सर्वत्र सापडतो पण परिघ अजून गवसला नाही, त्यामुळे या अफाट सामर्थ असणाऱ्या लोक राजाची कोणीही उंची गाठू शकणार नाही असे मत या प्रसंगी विलास खानोलकर यांनी व्यक्त केले याप्रसंगी त्यांचे साथीदार असणारे दशावतारी कलाकार संतोष रेवडेकर, प्रशांत मेस्त्री राजू हरियाण मान्यवरांनी आपला दाटून आलेला कंठ मनोगतातून भाव सुमनांजली देऊन आणि आठवणी जाग्या करून व्यक्त केला. जी ए सावंत सर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना या अफाट सागरा ची विशालता आणि त्याचा तळ गाठणे आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काम नाही असे प्रामाणिक मत व्यक्त केले. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे आयोजन करून मला पवित्र मंदिरात आल्याचे जाणवले असल्याचे भाव जीए सावंत यांनी आपल्या मनोगततून व्यक्त केले. लोकराजा सुधीर कलिंगण कालकथित झाल्यानंतर अनेक माध्यमाद्वारे त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. या भाव समर्पण कार्यक्रमात काव्यपटाद्वारे विलास खानोलकर यांच्या लेखणीतून साकार झालेल्या काव्यातून निर्माण झालेला काव्यपट हा त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा घेतलेला लखलखीत लेखाजोखा आहे असे मत उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त झाले. काव्यपटाचं दिग्दर्शन संकलन ध्वनी मिश्रण आणि संगीत शशिकांत कांबळी यांनी कल्पकतेने केले आहे. पटकथा निलेश पवार यांची तर छायांकन शैलेश तांबे यांनी केलं आहे हा काव्यपट लोक राजा सुधीर कलिंगण यांची चाहते असणाऱ्या प्रत्येक रसिक मनाचा आहे असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांकडून आला. फेसबुक आणि युट्यूब तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या काव्यपटाचे लोकार्पण काल संध्याकाळी साडेसात वाजता भावसुमनांजली या कार्यक्रमात करण्यात आले.