*कोकण Express*
*सिंधुदुर्गचा पालकमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा ही भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा ; राजन तेली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गचा पालकमंत्री भाजपाचा व्हावा ही येथील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या भूमीकडे आमचे लक्ष आहेत. अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आमची शंभर टक्के तयारी आहे. मात्र आयत्यावेळी वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीयमंत्री अजय कुमार मिश्रा हे ११ ऑगस्ट पासून “लोकसभा प्रवास नियोजन” योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीत आज कार्यकर्त्यांची नियोजन बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, प्रसन्ना देसाई, एकनाथ नाडकर्णी, युवराज लखम सावंत-भोसले, राजन म्हापसेकर आदींसह भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी दोडामार्ग मंडल अध्यक्षपदी सुधीर दळवी, तर अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्षपदी चंद्रकांत जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली.
श्री. तेली पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री मिश्रा हे ११ ऑगस्ट पासून लोकसभा प्रवास नियोजन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान तब्बल १८ महिने हा उपक्रम सुरू राहणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर अकरा ऑगस्टला ते बांद्यात दाखल होतील. त्या ठिकाणी त्यांचे स्वागत झाल्यानंतर तेथून ते कुडाळात जाऊन बैठक घेतील. तर 13 ऑगस्टला त्यांची सावंतवाडीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख, आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
श्री. तेली पुढे म्हणाले, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “घर घर मे तिरंगा” हा भाजपाकडून उपक्रम घेण्यात आला आहे. तो जिल्ह्यात यशस्वी करण्यासंदर्भात सुद्धा आज चर्चा झाली. याची जबाबदारी श्री. नाडकर्णी आणि संतोष कानडे यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रत्येक घराघरात तिरंगा पोचविण्यासाठी भाजपाचे प्रयत्न राहणार आहेत. त्यादृष्टीने तिरंगे कमी पडू नयेत म्हणून विशेष लक्ष दिले जाणार आहेत. आणि ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, राज्यात सत्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातील पालकमंत्री पद कमळ या चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारालाच मिळावे ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहेत. तर सद्यस्थितीत आम्ही येणाऱ्या निवडणुका भाजप म्हणून स्वबळावर लढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तशी आमची शंभर टक्के तयारी सुद्धा झाली आहे. मात्र आयत्यावेळी परिस्थिती बदलल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. तर आमदार केसरकर यांना मंत्रिपद मिळाल्यास वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्या स्वागता बाबत निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.