बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

*कोकण Express*

*बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात*

*स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई;बिबट्याचे कातडे,कार सह ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*

*कणकवली  ःःप्रतिनिधी* 

बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग विभागाने सापळा रचून तळेरे येथे श्रावण लक्ष्मण माणगावकर, (रा. तळेरे) ,राजेंद्र पंढरीनाथ पारकर (रा. वळीवंडे) या दोन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. त्या संशयितांकडे ३ लाख ५० हजारांचे बिबट्याचे कातडे व ८ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी कार असा सुमारे ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल आज हस्तगत केला आहे.वन्यप्राणी शिकार करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,भारत सरकार व महाराष्ट्र राज्याकडून वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता विविध योजना व कायदे तयार करण्यात आलेले आहेत. वन्यजीवांचे रक्षणाकरिता शासकीय यंत्रणा प्रयत्न करत असते. परंतु काही समाजकंटक स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस कातडे व त्यांच्या इतर अवयवांची विक्री करीत असतात. यावर आळा घालण्यासाठी वनविभाग व पोलीस दलाकडून वेळोवेळी कारवाया करण्यात येतात. सिंधुदुर्गमध्ये नैसर्गिक दृष्ट्या संपन्न अशी जंगले पशु पक्षांनी संपन्न आहेत. याचाच फायदा घेत काही वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले आहेत. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे याचा वेळोवेळी आढावाही घेतात.

४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांना त्यांच्या विश्वासनीय सूत्रांकडून जिल्ह्यात तळेरे येथे बिबट्याच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीची खातरजमा करून कारवाईचे आदेश सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले यांना देण्यात आले.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदाराच्या तळेरे येथे सापळा रचून दोघांना त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची तपासणी करता, एका वाहनामध्ये बिबट्याचे कातडे मिळून आले. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम १, ४४, ४९, ५१ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उप निरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार ए. ए. गंगावणे, पी. एस. कदम, पो. हवालदार के. ए. केसरकर, एस. एस. खाइये, आर. एम. इंगळे यांनी केली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!