*कोकण Express*
*ओसरगाव ग्रामस्थांच्यावतीने सर्पमित्रांचा सत्कार*
*सर्पमित्र नाव गोंडस असले तरी काम जीवघेण्या जोखमीचे – तहसीलदार रमेश पवार*
*पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सायकलपटू नितांत चव्हाण यांचा विशेष सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सर्पमित्र हे नाव जरी ऐकायला गोंडस असले तरी साप पकडताना प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळावे लागते. साप पकडणे आणि सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडणे हे सर्पमित्रांच्याच जीवघेण्या जोखमीचे आहे. ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे व ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने कणकवली तालुक्यातील सर्पमित्रांचा केलेला सत्कार हा सन्मानार्थी सर्पमित्रांना प्रेरणादायी आहे असे भावोद्वार कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी काढले. नागपंचमीचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांच्या संकल्पनेतून ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने कणकवली तालुक्यातील सर्पमित्रांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या सायकलपटूचा सत्कार ओसरगाव तलावाकाठी करण्यात आला. सर्पमित्र तन्मय आंगणे, अंकुर जाधव, यज्ञेश खरात, मयुरेश केळुसकर, सुमित वारंग, प्रतीक सावंत, ओंकार सावंत, संकेत सावंत, यश वर्दम, पार्थ सावंत, चैतन्य निग्रे यांच्यासह वरवडे येथील सायकलपटू नितांत चव्हाण यांचा तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना तहसीलदार रमेश पवार म्हणाले की सर्प म्हटलं की माणसाच्या मनात भीती निर्माण होते. भितीपोटी अनेकदा घरात शिरलेल्या सापांना मारले जाते. मात्र साप हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे. घरात शिरलेल्या सापांना स्वतःचा जीव धोक्यात घालून सुरक्षित जिवंत पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणारे सर्पमित्र हे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. सर्पमित्रांसाठी शासकीय पातळीवरून सहकार्य मिळण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करू असेही तहसीलदार पवार म्हणाले. यावेळी बोलताना ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे यांनी सर्पमित्र सत्कार संकल्पनेमागील भूमिका विषद करताना सांगितले की, सर्पमित्र हे साप पकडण्यासाठी बोलावणे आल्यानंतर पदरमोड करून स्वखर्चाने खेडोपाडी पोचत असतात. या सर्पमित्रांची तालुक्यात आणि जिल्ह्यात ओळख व्हावी, या सत्कार कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्पमित्रांची नावे जनतेसमोर यावीत. जेणेकरून कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात कुठेही सापांचे रेस्क्यू ऑपरेशन असेल तर या सर्पमित्रांशी समाजातून संपर्क साधणे सोपे होईल. सर्पमित्रांच्या वतीने सुमित वारंग यांनी सर्पमित्र म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी कथन करत शासनाकडून मदत आणि सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सुनील साटम, जेष्ठ नागरिक वाय. जी. राणे, हेमंत आंगणे, पोलीस पाटील संजना आंगणे, हेमंत तांबे, सुदर्शन नाईक चंदना राणे, चिनार राणे तसेच ओसरगावमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
we