*कोकण Express*
*वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*
*कणकवली ः प्रतिनीधी*
श्री संस्थान शांताश्रम मठाधिपती परमपूज्य वैश्य गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींजींचा चातुर्मास व्रत सोहळा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्कॉलरशिप प्राप्त दहावी, बारावी, पदवी मध्ये 60% हून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत बुद्धिवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार कणकवली तालुका वैश्य समाज आणि चातुर्मास सेवा समिती सिंधुदुर्ग यांनी आयोजित केला होता . यावेळी जिल्ह्याभरातील सुमारे १५० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक भाषणात दादा कुडतरकर अध्यक्ष वैश्य समाज तालुका कणकवली यांनी कोरोनाच्या बिकट कालावधीनंतर जिल्ह्याभरातील वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी हा महा गुणगौरव सोहळा घेण्यात आल्याचे सांगितले. आता उत्तम व्यापार व आर्थिक नियोजन करण्यासाठी उच्च शिक्षण घ्यावे लागते त्याचा फायदा भविष्यात व्यापार करण्याबरोबरच नोकरीसाठी सुद्धा होऊ शकतो. शिक्षणातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी करिअर नियोजन करण्यासाठी स्वतःची क्षमता आणि बलस्थाने ओळखून स्वतःला आवडेल असे क्षेत्र निवडा व त्यात आपली प्रगती साधावी: असे सांगितले. यानिमित्त युरेका सायन्स क्लबच्या संस्थापिका सुधमा केनी आणि भूषण पांगम BE ( I.E) गोवा यांची मुलाखत स्मिता नलावडे यांनी घेतली. यामध्ये आजची शिक्षण पद्धती, संस्कार आणि करियर संबंधी अनेक प्रश्नांचा उलगडा करून माहिती दिली.
यानंतर संदेश पारकर शिवसेना नेते आणि माजी उपाध्यक्ष सिंचन महामंडळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी खूप ज्ञान मिळवून समाजाचे नाव उज्वल करावे, यासाठी जे सहाय्य लागेल त्यासाठी आपण तत्पर आहोत, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती शिक्षण सम्राट अशोक नर, विश्वस्त वैश्य गुरुमठ हळदीपूर यांनी विद्यार्थ्यांनी जरी गुणवत्ता मिळवली तरी संस्कारापासून दूर राहू नये, इंग्लिश मीडियमच्या भुलभुलय्याच्या मागे न लाग लागता मातृभाषेतून शिक्षण घ्यावे. स्वतःची आवड क्षमता ओळखून निर्णय घ्यावा अभ्यास करताना मोबाईलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन केले. वैश्य समाजाच्या मुलांनी खूप शिकावे ज्ञान मिळवावे; परंतु व्यापार हे आपले बलस्थान आहे, शक्ती स्थान आहे, त्यामुळे त्याला महत्त्व द्यावे याची आठवण करून दिली. नीलम धडाम,महिला उद्योजिका यांनी 10 अन 12 मध्ये प्रथम क्रमांक ने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन गौरविले.
श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या उपस्थितीत हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. दीपक अंधारी, लहू पिळणकर, महेंद्र कुमार मुरकर, उमेश वाळके, प्रसाद अंधारी, महिला चातुर्मास सेवा समितीने शुभेच्छा दिल्या निवेदन व आभार दिवाकर मुरकर आणि श्रीकृष्ण यांचे गुरुजी यांनी मानले. स्मिता नलावडे यांनी मार्गदर्शनासह प्रभावी सूत्रसंचालन केले.