*कोकण Express*
*आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत होऊया*
*आनंद मोंडकर ;कणकवली येथे सकल हिंदु समाज मेळावा*
*कणकवली ः प्रतिनीधी*
हिंदु धर्मावर विविध मार्गाने आक्रमणे होत आहेत. यापूर्वीही शेकडो वर्षे हिंदु धर्माने आक्रमणे झेलली आहेत. या इतिहासातून शिकायला हवे. आपण हिंदु मी, माझे कुटुंब यापुरता विचार करत असून आत्मकेंद्रित झालो आहोत. राष्ट्र आणि धर्माप्रती आपली कर्तव्ये विसरलो आहोत. त्यामुळे लवजिहाद, धर्मांतरण यांसारख्या आक्रमणांना आपल्याला सामोरे जावे आहे. ९ राज्यांत हिंदु अल्पसंख्य होत आहेत. विविध जाती, संप्रदाय, भाषांमध्ये विभागलेल्या आपणास धर्माचा भगवा झेंडाच एकत्र आणू शकतो. त्यासाठी धर्मशिक्षण घेऊन संघटीत होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री.आनंद मोंडकर यांनी केले.
कणकवली येथील हॉटेल उत्कर्षामध्ये सकल हिंदु समाज जागरण अभियानतर्फे हिंदु बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी गटशिक्षणाधिकारी मोहन सावंत उपस्थित होते.
मेळाव्याची सुरूवात दत्तप्रसाद ठाकूर यांनी सादर केलेल्या सांघिक पद्याने झाली.
डॉ.बा.पु. करंबेळकर यांनी धर्माचरण या विषयावर मार्गदर्शन केले. ‘वसुधैव कुटुंबम्’ असा विचार करणारा आपला धर्म आहे. धर्म प्रजेला धारण करतो. अतिथी धर्म, माता, पिता, पुत्रधर्म असे प्रत्येकाची कर्तव्ये स्पष्ट करणारा धर्म आहे. या धर्माचे आचरण म्हणजे धर्माला अनुकूल असे जीवन जगणे होय. धर्माच्या पालनातून माणसावर संस्कार होत तो उन्नत होत जातो. स्वत:मधील दोष कमी करून देवत्वाकडे जाण्याचा हा प्रवास आहे, असे ते म्हणाले. श्री.रविंद्र ओंबळकर यांनी हिंदुंची सुरक्षितता आणि हिंदु सणांवरील आक्रमणे या विषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, हिंदु भित्रे आहेत हे धर्मांधांना माहित आहे. ते मंदिरे, गोमाता यांवर आक्रमणे करून हिंदूंना उकसवतात आणि मग दंगली करतात. गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्यांवर सशस्त्र आक्रमणे होतात. या प्रकारांविरोधात एकत्र येण्यासाठी आपली मंदिरे हे योग्य ठिकाण आहे. सांघिक उपासना आपल्या लढ्यास बळ देईल. गोहत्या बंदीची अंमलबजावणी होण्यासाठी शासनाकडे सातत्याने मागणी करायला हवी.
डॉ.तुळशीराम रावराणे यांनी समान नागरी कायद्याची आवश्यकता स्पष्ट केली. हिंदु लोकसंख्या वाढीचा वेग घटला असून मुस्लीम लोकसंख्या वाढीचा वेग वाढत आहे. समान नागरी कायदाविषयी सत्ताकारणामुळे कुठलेही सरकार कार्य करण्यास पाहत नाही. विविध प्रकरणातील खट्ल्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त करताना समान नागरी कायदा आणा, असे सांगितले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.कोमल काकतकर यांनी केले. सौ.प्रतिभा करंबेळकर यांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.