*जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे ; कसालात एक दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…*
ओरोस, ता. १० :
महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार कार्यशाळेत केले. ९ डिसेंबर रोजी सकाळी कसाल हायस्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग पोलिस दलाच्यावतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी पोलिस उपअधीक्षक संध्या गावडे, सावंतवाडी पोलिस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंखे, सायबर सेल सहायक पोलिस उपनिरीक्षक सुतार, पोलिस उपनिरीक्षक जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुख्याध्यापक गुरुनाथ कुसगावकर, विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले, जिल्ह्यातील महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रत्येक शाळेत कार्यशाळा घेऊन जनजागृती केली जाणार आहे. संध्या गावडे यांनी बाल लैंगिक अत्याचार व शोषण याबाबतची माहिती दिली. सुतार यांनी सोशल मीडियावर होणारे लैंगिक अत्याचार याबाबतची माहिती देऊन त्यावर काय उपाययोजना करावी याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.