नांदगाव येथील मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

नांदगाव येथील मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू

*कोकण Express*

*नांदगाव येथील मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू ….!*

*कणकवली ः प्रतिनीधी*

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील शरफुद्दीन मोहम्मद बटवाले (वय -५२) हे ओझरम येथे पियाळी नदीवर मासेमारी करण्यासाठी १९ जुलै ला दुपारी ३ वाजता गेले होते. नदीच्या काठावर ओझरम येथे गळ टाकून मासेमारी करत असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पाय घसरून ते नदीच्या पाण्यात कोसळले. त्याचा आवाज त्यांच्या सोबत असलेल्या हनिफ थोडगे यांना आला असता, त्यांनी शरफुद्दीन मोहम्मद बटवाले यांना जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन बाहेर काढले व क्षणाचाही विलंब न करता रिक्षाने तात्काळ नांदगांव आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र, तत्पुर्वीच शरफुद्दीन मोहम्मद बटवाले मृत झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तिठा येथून शरफुद्दीन हे आपल्या मेहुणीचा पती हनिफ अहमदअली थोडगे (मूळ रा. गगनबावडा, सध्या राहणार नांदगाव) यांच्याबरोबर मंगळवारी दुपारी मासेमारीसाठी गळ घेऊन गेले होते. मात्र ओझरम येथील नदीच्या काठावर पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत असताना हनिफ थोडगे यांनी पाण्याबाहेर काढत उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शरफुद्दीन यांना मृत घोषित केले. शरफुद्दीन बटवाले यांच्या मृतदेहावर बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शरफुद्दीन बटवाले यांचे नांदगाव तिठा येथे गेली काही वर्षांपासून चहा, नाश्ताचे हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

या घटनेचा तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!