*कोकण Express*
*शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरती न झाल्यास आंदोलन उभारु -श्री वामन तर्फे, श्री. गुरुदास कुसगांवकर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक, शिक्षकेतर भरतीवर बंदी आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेऊन त्यांच्यावर अन्याय केला जात आहे.शिक्षक आमदार मा.बाळाराम पाटील साहेब यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक संवाद दौरा सुरू आहे. आमदार साहेबांनी तालुकानिहाय बैठका घेऊन शिक्षण क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यातील इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार केला आहे. कसाल येथील शिक्षक दौऱ्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आमदार साहेबांचे स्वागत करण्यात आले. तसेच 133शाळांना आमदार निधीतून ग्रंथालय पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या वतीने जिल्ह्यातील समस्या मांडल्या. व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.कमी शिक्षक संख्या असूनही इयत्ता दहावी-बारावी परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर असल्याचे सांगतानाच शासनाने त्वरित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती करावी अशी मागणी केली आणि यासाठी मा. आ. बाळाराम पाटील यांनी विशेष प्रयत्न करावेत असे आग्रहपूर्वक सांगितले. पुढील काळात भरती झाली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांना घेऊन आंदोलन उभारले जाईल आणि याचे नेतृत्व आपणांस करावे लागेल असे श्री. वामन तर्फे आणि सचिव श्री. कुसगांवकर यांनी सांगितले.