*कोकण Express*
*”आम्ही नेहमीच हटके! हटवले जाऊ शकणारे ते आम्ही नव्हे!!” – भाजपाचे अविनाश पराडकर यांची पोस्ट चर्चेत*
*पदावरून हटवले गेल्याचे व्हायरल वृत्त बिनबुडाचे. राजकीय “गोट”बाजी ती हेराफेरी – अवि’ज टुडे ब्लॉकमधून मांडले वास्तव*
अविनाश पराडकर यांना कोणी पदावरून काहीही हटवले बिटवलेले नाही. आजही मी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सोशल मीडियाचा सदस्य आहे. मी माझ्या सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाचा (भाजपाचा नव्हे) राजीनामा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे दिला होता त्याला तब्बल वर्षापेक्षाही अधिक काळ लोटला होता. हा राजीनामा स्वीकारण्याचा आग्रहही मनापासूनच होता. पण कालपरवापर्यंत त्यावर काहीही निर्णय होत नव्हता. कालच्या जिल्हा बैठकीत त्या पदासाठी अन्य व्यक्तीची नियुक्ती राजन तेली यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केली असेल तर त्यात मला चुकीचे काही वाटत नाही. नियुक्ती झालेले समीर प्रभुगावकर नवे असले तरी उमदे आहेत, डॅशिंग आहेत आणि मुख्य म्हणजे माझे चांगले मित्र आहेत. हे माहीत नसल्याने कदाचित कोणीतरी पराचा किंवा पदाचा कावळा केला असावा. शेवटी, संघटनेत कोणतेही पद कायमस्वरूपी नसते आणि असूही नये. जिल्हाध्यक्ष म्हणून राजन तेली असो किंवा सोशल मीडिया जिल्हा संयोजक म्हणून मी… मुदत संपत आलेल्या पदावरचेच पदाधिकारी आहोत, आणि भाजपात पद हे अधिकार नव्हे, जबाबदारी असते असे परखड मत अविनाश पराडकर यांनी मांडले आहे.
ते पुढे म्हणतात की मी राजीनामा का दिला होता हे भाजपाच्या सर्व नेत्यांना माहीत आहे. काही गोष्टींची जाहीर वाच्यता न करणे ही देखील पक्षहिताचीच जबाबदारी असते. ज्येष्ठ नेते मा.नारायणराव राणे, आमदार नितेशजी राणे, प्रदेश सचिव निलेशजी राणे, प्रमोद जठार या सर्वच नेत्यांच्या मी सातत्याने संपर्कात आहे. भविष्यातील काही गोष्टींवर मी आजच भाष्य करणे अयोग्य. येणारा काळ त्याचे उत्तर नक्की देईल. तोवर विरोधकांनी संयम पाळणे त्यांच्याच हिताचे असेल असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
भाजपा सिंधुदुर्गमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे मत त्यांनी यापूर्वीही मांडले होते, त्याचा पुनरुच्चार करत ते म्हणतात की काही निर्णय समन्वयाने घेतले गेले तर विरोधकांना नको तो धूर पसरवण्याची संधी मिळत नाही. आपल्यासाठी या बातमीचा विषय कधीच संपला असून “जे हटके असतात त्यांना कधीही हटवले जात नसते, ते येतातही सन्मानाने आणि जातातही सन्मानाने” असेही त्यांनी म्हंटले आहे. ही पोस्ट चांगलीच राजकीय चर्चेत आली आहे.