*कोकण Express*
*ठेकेदारांकडून चिरीमिरी मिळविण्यासाठीच रुपेश राऊळ यांची धडपड; भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा आरोप*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून सावंतवाडी तालुक्यातील मंजूर झालेले २६ कि.मी. लांबीचे ग्रामीण रस्ते हे केंद्रातील भाजपा सरकारचे श्रेय आहे. सेनेचा यात काडीमात्र संबंध नाही. मात्र, आता श्रेय घेऊन ठेकेदारांना आपणच हे रस्ते आणले असे भासवून चिरीमिरी घेण्याचाच हा सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा प्रयत्न आहे, असा सनसनाटी आरोप भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. त्यांनी जर रस्ते मंजूर केले असते तर त्यांच्या मतदार संघातील एकही रस्ता मंजूर का नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सावंतवाडी नगरपालिका सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शितल राऊळ, माजी सभापती रवी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, माजी जि. प. सदस्य पंढरीनाथ राऊळ, वामन नार्वेकर आदी उपस्थित होते. रुपेश राऊळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यासाठी किमान दहा रस्ते मंजूर करून आणावेत, त्यांचा जाहीर सत्कार करू असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त-ओवाळीये-पारपोली ८ किमी, बांदा – सटमट वाडी, शेर्ल-इन्सुली, तिरोडा-आजगाव ह्या मागणी असलेल्या ग्रामीण मार्गांचा समावेश मंजूरबांद्रा सट्टा मट्टा वाडी रस्ता आराखड्यात करण्यात आला आहे. यातील कलंबीस्त पारपोली हा रस्ता माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रवि मडगावकर यांनी सुचवला होता. तर शेर्ले इन्सुली रस्ता सभापती मानसी धुरी यांनी सुचवला आहे. बांदा सटमटवाडी रस्ता उपसभापती शीतल राऊळ यांनी सुचवला आहे. या रस्त्यांसाठी सावंतवाडी पंचायत समितीने विकास आराखडा बनवला होता व केंद्र सरकारच्या ई- गवर्नन्स प्लटफॉर्मवर सदर आराखडयास प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रुपेश राऊळ यांनी फुकाचे श्रेय घेऊ नये असा टोलाही त्यांनी यावेळी आणला.